२१ ते २३ फेब्रुवारी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विशेष लेख..
भारताच्या संस्कृतीवर रामायण, महाभारताचा मोठा पगडा आहे. ज्या काळात एखाद्या गावात किंवा एखाद्या पंचक्रोशीत क्वचित एखादा लिहिणारा वाचणारा असे त्या काळातही महाभारतातील, रामायणातील किंवा पुराणातील कथा घराघरातील आजी आजोबा न चुकता रंगवून आपल्या नातवंडाना सांगत असत. हे सगळं ज्ञान त्यांना कुठून मिळत असे ?
स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत तरी भारतातील बहुतांश खेडी इतर दुनियेपासून दूर होती. बैलगाडी शिवाय इतर वाहन नसल्यामुळे पावसावर अवलंबून असलेल्या शेतीचे काम संपल्यानंतर पुढील पाच सहा महिने त्याच शेतातून बैलगाडीचा रस्ता जायचा. त्याशिवाय पायवाटा हा एकमेव मार्ग दुसऱ्या गावांना जोडण्यासाठी उपलब्ध होता. तरीही प्रत्येक गाव स्वयंपूर्ण होते, आनंदी होते. अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदार हे त्यांना नेमून दिलेले कामे करत असल्यामुळे, प्रत्येकाचं महत्त्व प्रत्येकाला माहित असल्यामुळे गावाचं लोक जीवन हे सुरळीत चालत होतं. प्रत्येक जाती जमाती त्यांच्या त्यांच्या सांस्कृतिक कलांचा आस्वाद घेत होते. मात्र ते सगळे एकाच धाग्यात गुंफल्यासारखे होते. तो धागा होता भारतीय संस्कृतीचा. कोकणभाग सुद्धा यापेक्षा वेगळा नव्हता. कोकणात भजन कीर्तन गाणारे होते, गोंधळ घालणारे होते, कुंभार क्रिया करताना डाक लावणारे होते, नमन जाखडी सारख्या मनोरंजनाच्या कला येथे होत्या. नाटकाचे खेळ इथे चालत होते. नवरात्रीत घरोघरी फिरून अंबाबाई ची आरती बोलणारे सरावदी होते. गोसावी होते. इतर व्यवसाय करणाऱ्या लोहार, सुतार, कुंभार यांच्यापेक्षा वरील मनोरंजन करणाऱ्या आणि ज्ञानात भर घालणाऱ्या कलांना ग्रामीण जीवनात आनंद देणाऱ्या कला म्हणून पाहिले जात होते. खरे तर हेच भारतीय संस्कृतीचे प्रसारक होते.
शेती हाच कोकणातील खेड्यांचा मुख्य व्यवसाय असल्याने दिवसभर काबाड कष्ट करणाऱ्या त्या कष्टकरी जनतेला विरंगुळा देण्याचं काम याच कलांनी केले. करमणुकीचे अन्य साधन नसल्यामुळे एखाद्या घरच्या गोंधळाला सुद्धा अंगणात मावणार नाहीत एवढी माणसांची गर्दी होत असे. धार्मिक भावनेमुळे उपस्थिती अनिवार्य असली तरी पेंगुळलेल्या डोळ्यांवर पाणी मारून रात्रभर जागून एखाद्या कलेचा आस्वाद घेण्याचा आनंद म्हणजे मनोरंजनाची भूक भागवण्याचा प्रकार असे. याचा परिणाम काय होई.?
रात्री ऐकलेल्या कीर्तनात निरूपणासाठी घेतलेला बुवांचा अभंग दुसऱ्या दिवशी शेताच्या बांधावर काम करत असताना आपसूक मुखातून बाहेर पडत असे. आपल्याला काही आठवत नसेल तर सोबत काम करणाऱ्या माणसाकडून ते जाणून घेतलं जायचं. मग तो कधी एकांतात किंवा सार्वजनिक ठिकाणी सहज बोलला जायचा आणि तो पक्का मनात बसून जायचा. गोंधळ आणि सांगितलेली चिलिया बाळाची कथा किंवा सत्यवान सावित्रीची कथा आई झोपणाऱ्या बाळाला थोपटत थोपटवत ऐकवायची. राम कसा आज्ञाधारक होता हे सांगताना उभ रामायण आपल्या मुलांच्या समोर जिवंत करण्याचं कसब त्यावेळच्या मातांना चांगले जमत असे.
आज कोकणात शिमग्याला किंवा गणपती उत्सवाला चाकरमान्यांची गर्दी होत असते ती केवळ परंपरा राखण्यासाठी असते. मात्र एकेकाळी हे सगळे सण इथल्या ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग होते. अजीर्ण झालं तरी देवाचा प्रसाद हा नाकारायचा नसतो तोच प्रकार शहरात राहून मनोरंजनाचा अजीर्ण होईपर्यंत आस्वाद घेतल्यानंतर वाड वडिलांची परंपरा पुढे चालवण्याच्या भावनेतून ही चाकरमानी मंडळी गावाकडे येत असतात. त्यात कलेचा आस्वाद घेण्याचा मुख्य गाभा आम्ही कधीचा विसरून गेलो आहोत.
स्वातंत्र्यपूर्व काळात खऱ्या अर्थाने कोकणातील प्रत्येक गाव मुखोद्गत साहित्याचा ठेवा पुढच्या पिढीला देत असताना दिसत असे. घरातल्या प्रत्येक दैनंदिन कामाबरोबर इथल्या माणसाच्या मुखात ओव्या असत, गाणी असत, उखाणे असत, म्हणी असत, भजन असे किंवा श्लोक असे. घरातली बाई पहाटेच्या वेळी दळण करण्यासाठी जात्यावरती बसायची तेव्हा ओव्या गाऊन ती स्वतःची करमणूक करायची. विहिरीवरच्या राहाटावर बसून मोग्यातून पडणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर याचेही गाणे असायचे त्यामुळे रहाट दाबताना पायात येणारे गोळे तो विसरून जायचा. शेतावरती चार माणसं जमून काम करत असताना, एकमेकांची थट्टा करताना गाण्यांच्याही मैफिली चालायच्या तर कधी एकमेकाला उखाणे देऊन उत्तरे जाणून घ्यायचा प्रयत्न होत असे. ‘उडत कोंबडा बुडत जाय सोळा शिंगे बत्तीस पाय ‘ किंवा ‘ घाटावरून आल्या बाया त्यांच्या लाल लाल डोया.’ असले उखाणे सोबत असलेल्या मुलांना डोकं खाजवायला भाग पाडायचे. याच स्त्रिया श्रावण महिन्यात रात्रीच्या वेळेला फुगड्या घालण्यासाठी एकत्र यायच्या वेगवेगळ्या तऱ्हेची गाणी म्हणता म्हणता फुगड्यांचे वेगवेगळे प्रकार नाचता नाचता अंगातून घाम जायचा पण मिळालेल्या क्षणांचा आनंद लुटताना देहभान विसरून जात.
त्या काळातील लग्न म्हणजे एक बिन वाद्यांचा तीन-चार दिवस चालणारा आर्केस्ट्राच होता. भात भरडताना ची गाणी वेगळी, हळदीची गाणी वेगळी रुखवताची गाणी वेगळी, घाणा भरतानाची गाणी वेगळी. नवरा नवरीची गाठ सोडताना बांधताना नाव घेण्याची तऱ्हा तर आणखी वेगळीच होती. लग्न मंडपातील जेवणावळीत पंगतीच्या श्लोकांची तर जुगलबंदी व्हायची. यात गंमत अशी होती की बोलणाऱ्यात वयोवृद्ध माणसांपासून तरुणांपासून सात आठ वर्षाची मुले सुद्धा त्यात भाग घेत असत याचा अर्थ केवळ पाठांतरावरती हे श्लोक पुढे पुढे चालत असत. शिमग्यात पालखीच्या सोबत गोमूचा नाद चालायचा त्यामध्ये एखाद्या युवकाला स्त्रीचा वेश देव ढोलकी आणि मंजिरीच्या तालावर नाच गाणे व्हायचे. त्यामध्ये गायली जाणारी गाणी स्थानिक लोक तिथल्या प्रसंगावर आधारित बनवायचे. ‘तुकाराम बोट बुडाली हरचेरी बंदरात’ ‘गोमू चालली बाजारा नाखवा घाली येरझारा’ आशा धापनेची ती गाणी असत. होळीच्या दिवशी दिलेल्या फाका या काहीशा शिवराळ असल्यातरी त्यातील यमक योग्य तऱ्हेने जुळवल्याने त्या अधिक आकर्षक ठरायच्या.
पुढे शाळा झाल्या. मुले शाळेत जाऊन शिकू लागली. शाळेतल्या शिक्षकांवरती सर्वांनी विश्वास टाकला. शिक्षणाचे तेच एकमेव साधन आहे याच्यावर शिक्कामोर्तब केले त्यामुळे लोक जीवनातून मिळणाऱ्या ज्ञानापासून शिकलेली पिढी दूर जाऊ लागली. गावातल्या बोलीला दुय्यम स्थान मिळाले आणि पुस्तकातल्याच भाषेवरती सर्वांनी अवलंबून राहण्याचे ठरवले. गावातली भाषा बोलणाऱ्याला गावंढळ म्हणून हेटाळणी होऊ लागली. प्रत्येक जण प्रमाणीत भाषेवरती जोर देऊ लागला आणि स्थानिक बोलीभाषेतून मिळणाऱ्या ज्ञानसंपदेपासून आपण दूर गेलो. काळ पुढे सरकत गेला. सगळ्याच बाबतीत आपण पुढारलेले आहोत हे दाखवण्याची अहंमिका सुरू झाली. घरात नळाचे पाणी आले आणि विहिरीवरती स्त्रीयांचे एकत्र येणे कमी झाले त्यामुळे तिथला संवाद तुटला तिथली गाणी बंद झाली. भाताला पर्याय असलेले हरिक धान्य आज काळाच्या पडद्याआड गेले आहे त्या शेताची भांगलण करण्यासाठी उभ्या गावाला बोलावलं जायचं. तिथे खेळ व्हायचे, वाद्य वाजायची, गाणी व्हायची त्या खेळाला सापड म्हटले जायचे. गोठ्यातली गुरे नाहीशी झाली आणि रानातला गुराखी दिसेनासा झाला. त्यामुळे संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी गुराख्यांचे बासरीचे मंजूळ सुर ऐकू येईनासे झाले.
आज भले आपल्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. भले यात पुढे अधिक साहित्य संपदा निर्माण होईल. प्रमाणित भाषेचा व्याप वाढेल, प्रसार वाढेल. पण ज्या काळात गाव गावातल्या मातीवर प्रेम करत होता, शेतीत राबत होता, वेगवेगळे व्यवसाय करीत होता त्यावेळी ची बोलीभाषा, त्या बोली भाषेतील शब्दसंपदा, त्या त्या बोली भाषेतील मौखिक साहित्य आज पडद्याआड गेले आहे. जर अभिजात मराठी भाषेला अधिक श्रीमंत करायचे असेल तर आता तग धरून असलेल्या गावांकडे साहित्यप्रेमीनी, लेखकांनी, कवींनी आपले पाय वळवायला हवेत. तिथल्या शेतांना, तिथल्या पाय वाटांना, तिथल्या निर्झराना, तिथल्या झाडांना, तिथल्या विहिरींना, तिथल्या नद्यांना बोलतं करायला हवंय. त्यांच्या तिथल्या बोलीभाषेचा गौरव करायला हवा आहे. खरं तर लोकभाषा अर्थात बोली भाषा याच कोणत्याही भाषेच्या मानदंड असतात. त्या जोपासल्या तरच भाषा फुलते, बहरते. गत दहा वर्षे मुंबईसारख्या महानगरातून’ राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई’ या संस्थेच्या माध्यमातून कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात लांजा राजापूर या दोन तालुक्यात ग्रामीण मराठी साहित्य संमेलनांचे आयोजन केले जाते. या संमेलनातून कोकणातील ग्रामीण बोलीभाषेला जोपासण्याचे कार्य चालले आहे. कोकणच्या ग्रामीण भागातील बोलीभाषेत सकस लिहिणाऱ्या कवि – लेखकांनाही यातून व्यासपीठ मिळते आहे. ही सर्व साहित्य चळवळ लोकवर्गणीतून उभी राहिली आहे.
सुभाष लाड
अध्यक्ष, राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई
९८६९१०५७३४