नवी दिल्ली, दि. 15 : वस्त्रोद्योग गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र शासनाने अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याचाच परिणाम म्हणून या सुरू असलेल्या भारत टेक्स एक्सपो मध्ये महाराष्ट्रासोबत 380 कोटींचे सामंजस्य करार झालेले आहेत, या करारामधून राज्यात दोन हजार पेक्षा अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी येथे दिली.
प्रगती मैदान येथील भारत मंडपम येथे 14 ते 17 फेब्रुवारी 2025 दरम्यान ‘भारत टेक्स एक्सपो 2025’ आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याने नॉलेज पार्टनर राज्य म्हणून सहभाग घेतला आहे. आज विविध सामंजस्य करार वस्त्रोद्योग मंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आज महाराष्ट्र राज्याच्या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले त्यावेळी श्री.सावकारे बोलत होते.
यावेळी केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाच्या सचिव नीलम शमीरा, राज्यातील वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, वस्त्रोद्योग आयुक्त संजय दैने, रेशीम संचालनालयाचे संचालक डॉ.विनय मून मंचावर उपस्थित होते.
श्री.सावकारे म्हणाले, वस्त्रोद्योग हा सर्वाधिक रोजगार देणारा उद्योग आहे. महाराष्ट्रात या संदर्भात चांगले काम होत आहे. महाराष्ट्र शासनाने वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी नवनवीन योजना तयार करून अधिकाधिक गुंतवणूक वाढविण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी महाराष्ट्र शासन वीज पुरवठा, जमीन उपलब्ध करून देणे आणि निगडित असणाऱ्या बाबींवर अनुदान देत आहे. याचा परिणाम वस्त्रोद्योग चांगली भरारी घेत आहे. केंद्र सरकारचा महाराष्ट्र शासनाला पूर्ण पाठिंबा असल्याचेही श्री सावकारे यांनी यावेळी सांगितले.
वस्त्रोद्योग क्षेत्रात सादरीकरणालाही फार महत्त्व असून या उद्योगात असणारे पारंपरिक व्यावसायिकांनी सादरीकरणावर आणि जाहिरातीवरही भर द्यावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र शासनाने वस्त्रोद्योग धोरण आणून या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी नवीन उमेद निर्माण केली आहे.
राज्य शासनाने 100 दिवसात करावयाच्या कामांतर्गत नागपूर येथे अर्बन हार्ट सुरू करण्यात येईल. याअंतर्गत या ठिकाणी वस्त्रोद्योग क्षेत्रातील विणकर, कलाकुसर करणारे कलाकार स्वतःच्या सामानांची विक्री एकाच ठिकाणी वर्षभर करू शकतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. यासह अमरावती येथे पीएम मित्र पार्क वस्त्रोद्योगासाठी तयार केलेले आहे, असेही सावकारे यांनी यावेळी सांगितले.
केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाच्या सचिव नीलम शमीरा यांनी महाराष्ट्रात पारंपारिक वस्त्रोद्योग क्षेत्राशी निगडित चांगले काम सुरू आहे. इचलकरंजी सारख्या छोट्या शहरात एक लाखापेक्षा अधिक यंत्रमाग आहेत, अशीच इचलकरंजी सारखी गावे भारतात इतरत्र सुरू करण्याचा केंद्र शासनाचा मानस असल्याचे सांगितले. केंद्र शासन वस्त्रोद्योग वाढीसाठी सर्वतोपरीने महाराष्ट्र राज्याला मदत करत आलेला आहे यापुढेही करत राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
सचिव विरेंद्र सिंह यांनी आपल्या मनोगतात म्हणाले, वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करणारे लोक हे उत्कटतेने काम करतात, त्यांना शासनाकडून प्रोत्साहन मिळाल्यास ते अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतील आणि तोच प्रयत्न महाराष्ट्र शासन करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आज झालेल्या सत्रामध्ये महाराष्ट्र तांत्रिक वस्त्रोद्योग मिशन’ चे लॉन्चिंग करण्यात आले. महाराष्ट्र शासन आणि प्रसार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील हातमाग विणकारांवर आधारित ‘करघा’ या वेब सिरीजचे तसेच Anthem चे लॉन्चिंग करण्यात आले. करघा या वेब सिरीज चा पहिला भाग हिमरू पारंपरिक या प्रकारावर असून तो दाखविण्यात आला. सर्वांसाठी ही वेब सिरीज 28 तारखेपासून प्रसार भारतीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.
या कार्यक्रमामध्ये राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ, रेशीम संचालनालय व महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ असे एकूण ५ स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. या एक्सपोमध्ये महाराष्ट्र अधिक ठळक दिसेल यासाठी उपसचिव श्रीकृष्ण पवार, कक्ष अधिकारी प्रमोद पवार, अंजुम पठाण यांनी विशेष प्रयत्न केला.
000000