केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असून राज्य सरकारने या अनुषंगाने अनेक शासन निर्णय घेऊन मराठी राज्याचे भाषा धोरण जाहीर केले आहे. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक साहित्यिकांनी मराठी भाषा वृध्दिंगत व्हावी, मराठी भाषेचा आविष्कार घडावा यासाठी आपल्या लेखणीतून मराठी भाषेला आगळा वेगळा साज चढविला आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी भाषेबरोबरच पाली, पाकृत, असामी, बंगाली या भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे या सर्व भाषा समृध्द होण्यास मदत होणार आहे.
या निर्णयामुळे मराठी भाषेचा विकास आणि समृध्द होण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्य संग्रह करणे, प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे, भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकण्याची सोय करणे, महाराष्ट्रातील १२ हजार ग्रंथांना सशक्त करणे, मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा सर्व घटकांना भरीव मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असून या अनुषंगाने साहित्य चळवळीचा इतिहास चाळला जात आहे.
सोलापूर ही जशी हुतात्म्यांची नगरी म्हणून ओळखली जाते तशी साहित्य चळवळीचे केंद्रस्थान म्हणूनही या शहराकडे पाहिले जाते. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी मराठी भाषेत वेगवेगळ्या माध्यमातून लेखन केले असून मराठी साहित्याला या लेखकांच्या माध्यमातून आगळावेगळा साज चढवला आहे. स्वातंत्र्य चळवळीपूर्वी सुरुवात झालेली मराठी साहित्याची चळवळ अजूनही सुरु आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी सोलापूरचे कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा आणि जगन्नाथ शिंदे यांना हौतात्म्य पत्करावे लागले. याशिवाय स्वातंत्र्य शाहीर म्हणून कवी कुंजविहारी यांचेही नाव घेतले जाते. तसेच कवी संजीव, वि. म. कुलकर्णी, रा. ना. पवार इत्यादी बड्या साहित्यिकांनी मराठी साहित्यात सोलापूरचे नाव उज्ज्वल केले आहे. जन्माने सोलापूर जिल्ह्यातील असलेले आणि महाराष्ट्राच्या साहित्य व सांस्कृतिक इतिहासात स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारे अनेक साहित्यिक आहेत. त्यामध्ये करकंबचे न्या. म. गो. रानडे, मोडनिंबचे न. चिं. केळकर, सोलापूरचे डॉ. य. दि. फडके, डॉ. जब्बार पटेल, बार्शीचे शाहीर अमर शेख, पंढरपूरचे द. मा. मिरासदार, माळशिरसचे ना. स. इनामदार, सोलापूरचे शरणकुमार लिंबाळे इत्यादी मान्यवर साहित्यिकांचा समावेश आहे. त्यानंतरच्या काळात डॉ. गो. मा. पवार, त्र्यं. वि. सरदेशमुख, सुरेखा शहा, विजया जहागिरदार, कवी दत्ता हलसगीकर, कवी लक्ष्मीनारायण बोल्ली, प्रा. राजेंद्र दास, निर्मलकुमार फडकुले, कवी माधव पवार, डॉ. सुहास पुजारी, प्रा. विलास पाटील, डॉ. व. ना. इंगळे, डॉ. भगवानदास तिवारी, डॉ. इरेश स्वामी, डॉ. राजशेखर हिरेमठ, शशिकला मडकी, डॉ. कृष्णा इंगोले, डॉ. वामन जाधव, डॉ. सूर्यकांत घुगरे, डॉ. महेंद्र कदम, योगिराज वाघमारे, मारुती कटकधोंड, पन्नालाल सुराणा, निशिकांत ठकार, डॉ. अर्जुन व्हटकर अशी अनेक साहित्यिकांची मांदियाळी सोलापूरच्या नगरीमध्ये दिसून येते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन सोलापुरात २००६ साली करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्षपद मूळचे सोलापुरातील रहिवाशी असलेले मारुती चितमपल्ली यांना मिळाले. त्यांनी निसर्गाविषयी आणि प्राणीपक्ष्यांविषयी विपुल लेखन केले आहे. केंद्र सरकारने नुकताच त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले आहे.
केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठी भाषा वृध्दिंगत व्हावी, भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा तसेच ही भाषा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी यासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा धोरणच जाहीर करण्यात आले आहे. पुढील २५ वर्षात मराठी भाषेचा विकास करणे शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये इत्यादींना मराठी भाषा विकासासाठी प्रोत्साहन देणे असे धोरण राज्य सरकारने जाहीर केले आहे. याशिवाय न्यायालयात आणि प्रशासकीय कामकाजात मराठी भाषा आवश्यक असल्याचे शासन निर्णय देखील घेण्यात आले आहेत. एकंदर केंद्र सरकारचे धोरण आणि राज्य सरकारचे धोरण यामुळे मराठी भाषा वृध्दिंगत होण्यास मदत होणार आहे.
-उज्ज्वलकुमार माने, सोलापूर