तापी व कोकण विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत २३ विषयांना मान्यता
मुंबई, दि. १८ :– पाटबंधारे प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यात आलेल्या भूसंदर्भ प्रकरणांमध्ये पॅरिटीच्या आधारावर केलेल्या तडजोड प्रकरणातील रक्कम संबंधित शेतकऱ्यांना तातडीने दिली जावी, असे निर्देश जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
जलसंपदा मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तापी व कोकण खोरे पाटबंधारे विभाग नियामक मंडळाची बैठक मंत्रालयात झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक अतुल कपोले, तापी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक ज. द. बोरकर, जलसंपदा विभागाचे सह सचिव अभय पाठक व महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री महाजन म्हणाले, पाटबंधारे प्रकल्पासाठी भूसंपादन महत्त्वाची बाब आहे. भूसंपादन प्रक्रियेवर बराचसा निधी खर्च होत असल्याने भू संपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करून सिंचन प्रकल्पांना गती द्यावी. भूसंपादनसाठी आवश्यक निधीची मागणी विभागाने तातडीने करावी. आवश्यक निधी शासन स्तरावरून उपलब्ध करून दिला जाईल.
तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या ७० व्या बैठकीत १६ विषयांना तर कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या ८७ बैठकीत ७ विषयांना मान्यता देण्यात आली.
००००
एकनाथ पोवार/विसंअ