मुंबई दि. १८ : जळगाव जिल्ह्याच्या जळगाव व चोपडा तालुक्यांना जोडणारा खेडीभोकरी ते भोकर हा तापी नदीवरील महत्त्वाचा फूल आहे. या पुलाच्या कामाच्या खर्चास जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
जलसंपदा मंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, तापी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक ज. द. बोरकर, जलसंपदा विभागाचे सह सचिव अभय पाठक आदी उपस्थित होते.
तापी नदीवरील खेडीभोकरी ते भोकर या पुलाची लांबी ८८४ मीटर, रुंदी १० मीटर आणि उंची २७ मीटर इतकी आहे. हा पूल सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागामार्फत बांधण्यात येणार आहे. या पुलामुळे प्रवासाचे अंतर कमी होऊन वेळेची व इंधनाची बचत होणार आहे. प्रवास जलद गतीने होईल असे यावेळी सांगण्यात आले.
००००००
एकनाथ पोवार/विसंअ