भाषेच्या इतिहासात अकोल्याचे स्थान अनन्यसाधारण

‘तुमचा अस्मात् मी नेणे गा : मज श्रीचक्रधरे निरुपल्ली मऱ्हाटी : तियाचि पुसा :’ हा मराठी बाणा व-हाडाने कायम जपला आहे. संत चक्रधरांचे शिष्य आचार्य नागदेव हे व-हाडातील. त्यांनी केशिराजांसारख्या संस्कृतज्ञ शिष्यांकडून त्यांनी मराठी भाषेत ग्रंथरचना करवून घेतली. मराठी भाषेच्या इतिहासात व-हाडभूमीचे आणि अकोल्याचेही स्थान अनन्यसाधारण आहे.

महानुभाव पंथाचे संस्थापक श्रीचक्रधर यांनी आपल्या तत्त्वज्ञानाचा मराठी या लोकभाषेत प्रचार केला. पंथाचे आचार्य नागदेव यांनीही हा दृष्टिकोन कटाक्षाने आचरणात आणला. या तत्वज्ञान व लोकभाषेच्या आग्रहापोटी मराठी भाषेत अमूल्य ग्रंथसंपदा निर्माण झाली. याच भूमीत मराठी भाषेचा आद्य मराठी ग्रंथ लीळाचरित्र लिहिला गेला.

श्री चक्रधर स्वामींनी ज्ञान आणि भक्ती यांचा समन्वय करून तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. धर्माचे तत्वज्ञान जनभाषेत सांगितले. श्री चक्रधरस्वामी आणि पुढे इतर संतांनी केलेला लोकभाषेचा पुरस्कार हे या काळातील एक मोठे सांस्कृतिक कार्य होते. हा व-हाडाचा आणि महाराष्ट्राचा गौरवास्पद इतिहास आहे.

महानुभाव पंथांमध्ये सात ग्रंथ प्रसिद्ध आहेत. यापैकी ज्ञानप्रबोध या ग्रंथाचे लिखाण पं. विश्वनाथ बाळापूरकर यांनी अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे केले होते. या ग्रंथात बाराशे ओव्या असून, काव्याची बैठक पारमार्थिक आहेते. काव्य व तत्त्वज्ञान यांचा संगम; वैराग्याची व भक्तीची शिकवण या ग्रंथात आहे.

महानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांनी अकोला जिल्ह्यात आठ ठिकाणी भेट दिल्याचे सांगितले जाते. त्यात मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी व माना, अकोला तालुक्यातील येळवण, बार्शिटाकळी तालुक्यातील बार्शिटाकळी व भटाळी, तसेच पातूर तालुक्यातील आलेगाव व भटाळी या गावांचा समावेश आहे. चक्रधरस्वामींच्या जिल्ह्यातील संचारामुळे येथील भूमीत तीर्थक्षेत्रे व त्यांना अनुसरणारा संप्रदाय निर्माण झाली.

संकलन : हर्षवर्धन पवार, अकोला