- स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी – तारा भवाळकर
नवी दिल्ली दि.२१ : भाषा केवळ संवादाचे माध्यम नसून ती संस्कृतीची संवाहक असते. भाषा समाजातच जन्मतात आणि समाजाच्या निर्मितीत मोठी भूमिका निभावतात. मराठी भाषेने महाराष्ट्रातीलच नव्हे देशातील अनेक महापुरूषांच्या विचारांना अभिव्यक्ती देऊन सांस्कृतिक निर्माणाचे महान कार्य केले आहे, असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथे काढले. भारतीय भाषांमध्ये कधीही वैरभाव नव्हता. येथील सर्व भाषांनी एकमेकांना समृद्ध केले असून भाषिक भेदांपासून दूर राहून भाषा संवर्धित करणे ही सर्वांची सामुहिक जबाबदारी असल्याचे आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केले.
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर, मावळते अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे , कोषाध्यक्ष प्रकाश पागे, संमेलनाचे निमंत्रक संजय नहार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
साहित्य संमेलनासाठी आलेल्या सर्वांचे मराठीत स्वागत करून प्रधानमंत्री म्हणाले, मराठी साहित्य संमेलन एका भाषेपुरते मर्यादित नाही. त्यास स्वातंत्र्य संग्रामाचा गंध असून तो एक मोठा सांस्कृतिक वारसा आहे. 1878 पासून देशातील अनेक महान व्यक्तींनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. या परंपरेशी जोडेले जाण्याचा मला विशेष आनंद आहे. जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून होत असलेले संमेलनाचे आयोजन प्रशंसनीय आहे. ज्ञानेश्वरांनी ‘माझ्या मराठाचि बोलू कौतुके, अमृताते पैजा जिंके’ असे म्हटले आहे. मराठी भाषेवर माझे खूप प्रेम आहे. मराठी भाषा शिकण्याचे प्रयत्न मी निरंतर करीत आहे. अशा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम पूर्ण करण्याची संधी मिळाल्याचे मला मोठे समाधान आहे, असेही श्री मोदी यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे 300 वे जयंती वर्ष आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केल्याच्या पार्श्वभुमीवर हे संमेलन होत आहे, असे सांगून पंतप्रधान म्हणाले, 100 वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. वेदापासून विवेकानंदांपर्यंत नव्या पिढीला पोहोचविण्याचा संस्कारयज्ञ या माध्यमातून चालविला जात आहे. संघाच्या माध्यमातून मराठी भाषा आणि परंपरेशी जोडले जाण्याची मला संधी मिळाली. मराठी एक परिपूर्ण भाषा असल्याचे स्पष्ट करताना प्रधानमंत्री म्हणाले, मराठीत शुरतेसोबतच वीरता देखील आहे, सौंदर्य आणि संवेदना दोन्ही आहेत, समानता आणि समरसता आहे, मराठीत अध्यात्म आणि आधुनिकताही आहे. शक्ती, भक्ती आणि युक्तीदेखील आहे. देशाला आध्यात्मिक ऊर्जेची गरज असतांना महाराष्ट्राच्या थोर संतांनी ऋषींचे ज्ञान मराठीत जनतेसमोर ठेवले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामदास, संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, गोरा कुंभार आदी अनेक संतांनी भक्ती आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला नवी दिशा दिली. आधुनिक युगात ग.दि.माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या गीत रामायणाने समाजावर प्रभाव टाकला आहे.
गुलामीच्या शेकडो वर्षाच्या कालखंडात मराठी भाषा आक्रमणकर्त्यांपासून मुक्तीचा जयघोष बनली. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि बाजीराव पेशव्यांसारख्या वीरांनी शत्रूंना मागे सारले. स्वातंत्र्य संग्रामात वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, वीर सावरकरांनी इंग्रजांची झोप उडवली. मराठी साहित्याने देशप्रेमाची धारा प्रवाहीत झाली. या साहित्याने देशप्रेमाचा जागर केला, जनतेला नवी ऊर्जा दिली. अशा शब्दात मराठीची महती व्यक्त करून पंतप्रधान म्हणाले, मराठी साहित्याने समाजातील वंचित, शोषितांसाठी मुक्तीचे दरवाजे खुले करण्याचे कार्य केले. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षि कर्वे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक मराठी समाजसुधारकांनी नवा विचार देण्यचे कार्य केले. मराठी भाषेने समृद्ध दलित साहित्य देण्याचे कार्य केले. मराठी भाषेने प्राचीन विचारांसोबत विज्ञानही मांडले. महाराष्ट्राने प्रागतिक विचार स्विकारले. मुंबई देशाची आर्थिक राजधानी बनली आहे. मुंबईने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला पुढे नेले.
देशाची भाषिक विविधता आपल्या एकतेचा मजबूत आधार असून मराठी याचे उत्तम उदाहरण असल्याचे सांगताना प्रधानमंत्री म्हणाले, भाषा एखाद्या आईप्रमाणे मुलांना नवा विचार देते, विकासाशी जोडते, भेद करीत नाही. भाषेने माणूसकीच्या विचारांना अधिक व्यापक केले आहे. मराठीने इतर भाषेतून साहित्य स्विकारले आणि त्या भाषांनाही समृद्ध केले. अनेक चांगल्या रचनांचे मराठीत भाषांतर झाले आणि मराठीतीतील उत्तम साहित्याचे इतर भाषात भाषांतर झाले. भाषांनी स्वत: सोबत इतरांना समृद्ध केले. हा समरसतेचा प्रवाह आणखी पुढे नेण्याची गरज आहे.
मराठीसोबत सर्व प्रमुख भाषेतून उच्च शिक्षणाला प्राधान्य देण्यात येत आहे. महाराष्ट्रातील युवक आता मातृभाषेतून उच्च शिक्षण घेवू शिकेल, असे सांगून प्रधानमंत्री म्हणाले, साहित्य समजाचा आरसा असतो. त्यामुळे साहित्य संमेलन, साहित्यिक संस्थांची देशाच्या विकासात महत्वाची भूमिका आहे. मराठीतीत महान विभूतींनी स्थापन केलेले आदर्श आणखी पुढे नेण्याचे कार्य महामंडळ करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. समाजमाध्यमांद्वारे मराठी साहित्यात योगदान देणाऱ्या युवकांना प्रोत्साहन द्यावे, युवकांच्या स्पर्धांचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
शिवाजी महाराजांकडून स्वभाषेचा आग्रह आणि अभिमान – फडणवीस
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे संमेलन दिल्लीत होणे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, जगभरातील मराठी माणसांचे स्वप्न या निमित्ताने पूर्ण झाले. परकीय आक्रमकांनी आपल्या भाषेला प्रदुषित करण्याचा प्रयत्न केल्यावर शिवाजी महाराजांनी राजकारभारात मराठीचा उपयोग करण्याचा निर्णय केला. सर्व फारसी, ऊर्दु शब्द वगळून मराठीचे शब्द आणण्याची परंपरा त्यांनीच सुरू केली. स्वभाषेचा अभिमान आणि आग्रह छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच आपण शिकलो आहोत. संमेलन होत असलेल्या तालकटोरा स्टेडिअममध्ये 1737 मध्ये मराठ्यांनी आपली छावणी लावून दिल्ली जिंकली होती. आता आमचा मराठी माणूस आपल्या विचारांनी दिल्ली जिंकणार आहे. विश्व मराठी संमेलनात पु.ल. देशपांडे म्हणाले होते, आपल्या मातृभाषेवर प्रेम करणाऱ्याला माया आणि वात्सल्य समजतं आणि तो दुसऱ्या भाषेवरही प्रेम करतो. मराठी भाषेने असे सर्वांना आपलेसे केले आहे. ती लोकभाषा होऊन, लोकसाहित्य निर्माण झाल्याने मराठी समृद्ध झाली. संतांनी मराठी भाषा अधिक समृद्ध केली. कला, साहित्य, संस्कृती मराठी माणसाच्या ठायी वसलेली आहे. त्यामुळेच वेगवेगळी साहित्य संमेलने महाराष्ट्रात होत असतात, त्यात बोली भाषांना स्थान मिळत असते. दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठीची सेवा करण्याची संधी सर्वांना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. हे अधिवेशन ऐतिहासिक ठरणार असल्याचे सांगून 100 वे अधिवेशनही भव्य स्वरुपात साजरे करण्यात येईल, असेही श्री.फडणवीस म्हणाले.
संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी – भवाळकर
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विविध बोलींचे संमेलन आहे आणि पंतप्रधानांना भेट दिलेली विठ्ठलाची मूर्ती ही महाराष्ट्राच्या उदार संस्कृतीचे प्रतिक असल्याचे नमूद करून डॉ.तारा भवाळकर म्हणाल्या, मराठी भाषेचे महत्व संत ज्ञानेश्वर, संत एकनाथांनी मांडले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन करण्यापूर्वी संतांनी त्यासाठी पोषक भूमी तयार केली होती. मराठी भाषा संतांनी टिकवली. भाषा जीवनात असावी लागते. भाषा जैविक गोष्ट असून, ती बोलली तर जीवंत रहाते. महाराष्ट्राला पांडुरंगांचे स्मरण मराठीतून करायला लावणाऱ्या संतांनी मराठी जिवंत ठेवली. ज्या दिवशी आईने पहिली ओवी बाळासाठी म्हटली असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माला आली असेल. संतांनी विठ्ठलाशी संवाद साधतांना मराठी भाषेतून साधला. संत खऱ्या अर्थाने पुरोगामी विचाराचे होते. या सर्वांना मिळून मराठी भाषेचे अभिजातपण आले आहे. मराठी बोलीतून पसरली म्हणून शिवाजीमहाराजांना खेड्यापाड्यातून मावळे मिळाले. भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असते. भाषा ही आपलेपण निर्माण करणारी, जोडणारी गोष्ट असली पाहिजे, तोडणारी नाही. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होण्यासाठी स्त्री असण्यापेक्षा गुणवत्त हा महत्वाचा आधार आहे. दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र विचारातून, साहित्यातून जीवंत राहिला आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रेमाचा संदेश दिला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
वर्तमान काळात साहित्यिकांवर महत्वपूर्ण जबाबदारी – पवार
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलेच साहित्य संमेलन दिल्ली येथे होत असून त्याचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असल्याबद्दल विशेष आनंद असल्याचे सांगून श्री.पवार यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल श्री. मोदी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, संत परंपरेपासूनच सर्वसमावेशक विचार मांडण्याचे काम मराठी साहित्यिकांनी सातत्याने केले. महिला साहित्यिकांच्या योगदानाने मराठी साहित्य समृद्ध झाले आहे. समाजाला मार्गदर्शन करण्याचे काम साहित्यिकांनी केले. साहित्यिकांची जबाबदारी वाढली असून समाजाला समाजसुधारकांच्या विधायक मार्गाने नेण्याचे काम साहित्यिकाने करण्याची आवश्यकता आहे. नव्या पिढीला पुस्तकांशी बांधून ठेवण्यासाठी नव्या माध्यमांचा कल्पकतेने वापर करायला हवा. नव्या पिढीमध्ये साहित्याची गोडी टिकून राहिली तरच साहित्याला भवितव्य असेल. महिलांना अध्यक्षपदाचा मान अधिकाधिक मिळाला तर महिला साहित्यिकांची परंपरा आणखी वेगाने पुढे जाईल. राजकारण आणि साहित्यातील संबंध पूर्वीपासून आहे, ते परस्पराला पूरक आहेत असेही श्री.पवार म्हणाले.
श्री.नहार म्हणाले, दिल्लीतील साहित्य संमेलनाच्या माध्यमातून लेखणी आणि ग्रंथालयाचे महत्व पोहोचविणारे आहे. पंतप्रधानांच्या हस्ते संमेलनाचे होणारे उद्घाटन राज्याच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिले जाईल. देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राच्या सकारात्मक भूमिकेची पायाभरणी करणारे हे संमेलन आहे.
प्रास्ताविकात श्रीमती तांबे यांनी संमेलनाच्या आयोजनाविषयी माहिती दिली. मराठी मनाचं देशाच्या राजधानीशी असलेलं नातं जवळ आणणारं हे संमेलन असल्याचे त्यांनी सांगितले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि रुकय्या मकबूल यांच्या नवकार मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शमीमा अख्तर यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव, विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर, विनय सहस्रबुद्धे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
०००