अहिल्यानगरचे वाङ्मयोपासक मंडळ

मराठी भाषा अनेक कारणांनी समृद्ध होत गेली आहे. अनेकांनी त्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठीच्या प्रवासाचे एका अर्थाने मंथनचं सुरु झाले आहे. मराठीला योगदान दिलेल्या छोट्या मोठ्या प्रवाहांची यानिमित्ताने चर्चा होत आहे. सध्याचे अहिल्यानगर तत्कालिन अहमदनगरमध्ये सुमारे ९७ वर्षांपूर्वी ‘वाङ्मयोपासक मंडळ’ स्थापन झाले होते. या निमित्ताने मराठी भाषाप्रेमी, साहित्यरसिकांना या घटनेचा इतिहास जाणून घेण्यासाठी या लेखाची नक्कीच मदत होईल…

मराठी भाषेवरच्या प्रेमापोटी सुमारे ९७ वर्षांपूर्वी अहमदनगरमध्ये (आताचे अहिल्यानगर) ‘वाङ्मयोपासक मंडळ’ स्थापन झाले होते. या संस्थेची स्थापना १९२८ मध्ये न्यायाधीश श्री. फाटक यांच्या प्रोत्साहनाने झाली. मंडळाचे तेच पहिले अध्यक्ष. १९३० मध्ये या मंडळाची रितसर नोंदणी केली गेली. मायबोली मराठीचा विकास व्हावा, असे वाटणारी मंडळी हळूहळू यानिमित्ताने एकत्र येऊ लागली.

वाङ्मयाची अभिवृद्धी करणं, वाङ्मयोपासकांना एकत्र आणणं, साहित्यविषयक व्याख्यानं आयोजित करणं, प्राचीन आणि ऐतिहासिक वाङ्मयाचं परिशीलन करून त्याच्या प्रसिद्धीसाठी खटपट करणं, उत्साही लेखकांना उत्तेजन देणं, याशिवाय नगर आणि नाशिक जिल्ह्यातील वाङमयोपासकांची शाखा संमेलनं भरवणं आणि प्रसिद्ध साहित्य सेवकांचा परिचय घडवून आणणं देणं हे या मंडळाच्या स्थापनेचे उद्देश होते. काव्य, शास्त्र, विनोद, नाट्य आदी विषयांवर मंडळानं साहित्य प्रकाशित करायला सुरुवात केली. आजचा नाशिक जिल्हा पूर्वी नगर जिल्ह्यात समाविष्ट होता. इंग्रज राजवटीत नाशिक जिल्हा वेगळा केला गेला, तरी सांस्कृतिकदृष्ट्या नगर आणि नाशिकचं एकत्व अबाधित असल्यानं दोन्ही जिल्ह्यांतील साहित्यिकांनी दरवर्षी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं एकत्र यायचं ठरवलं.

वाङ्मयोपासक मंडळानं १५ फेब्रुवारी १९३१ रोजी पहिलं पुस्तक प्रकाशित केलं. त्याचं नाव होतं ‘काव्य-शास्त्र-विनोद’. या पुस्तकाची किंमत होती एक रुपया. या पुस्तकावर प्रकाशक म्हणून मंडळाचे चिटणीस जगन्नाथ एकनाथ नरवणे यांचं नाव आहे. लेख आणि कविता मिळवण्याचं काम मंडळाचे चिटणीस केशवराव लक्ष्मण टेंभुर्णीकर यांनी जिल्हाभर आणि जिल्ह्याबाहेर हिंडून केलं होतं. पद्य विभागात संत दासगणू, के. ल. टेंभुर्णीकर, गोपाळ, ना. य. मिरीकर, ग. ल. ठोकळ, गिरिजात्मज, मनोरमाबाई रानडे, दासविठू कोल्हारकर, वि. प्र. घुले, दत्ताग्रज, वेणुबाई मोडक, विठ्ठलराव घाटे, बा. रा. सिन्नरकर, त्र्य. रा. गोडगे, भां. शं. देवस्थळी, मो. शं. मुळे आणि गोमागणेश यांच्या काव्यरचना आहेत. ( ‘गोमागणेश’ हे टोपणनाव घेऊन गणेश कृष्ण फाटक हे कविता लिहायचे.)

नगरचे दिवंगत साहित्यिक डॉ. पां. दा. गुणे, कवि दत्त, शिवरामपंत भारदे, रेव्हरंड नारायण वामन टिळक, बालकवी ठोंबरे आणि अण्णासाहेब हिवरगावकर यांना हे पुस्तक समर्पित करण्यात आलं होतं. प्रस्तावना लिहिली होती मंडळाचे अध्यक्ष नरहर बाळकृष्ण देशमुख यांनी आणि हे पुस्तक प्रकाशित झालं नगर आणि नाशिककरांच्या १९३१ मधील पहिल्या संमेलनात. मुंबईचे प्रिन्सिपाल पाध्ये यांच्या अध्यक्षतेखाली नगरमध्ये हे संमेलन पार पडलं होतं.

दुसरं संमेलन संगमनेरला शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्या अध्यक्षतेखाली झालं. १९३३ मध्ये झालेल्या मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचं अध्यक्षस्थान दैनिक केसरीचे संपादक ज. स. ऊर्फ तात्यासाहेब करंदीकर यांनी भूषवलं होतं. १९३३ च्या संमेलनात वाङ्ममयोपासक मंडळानं `ज्ञानेश्वर दर्शन’ नावाचा सुमारे आठशे पानांचा ग्रंथराज प्रसिद्ध करायची योजना जाहीर केली. ही कल्पना मंडळाचे उत्साही चिटणीस कवी केशवराव टेंभुर्णीकर यांनी १९३१ मध्येच सूचवली होती. या प्रकल्पाची रूपरेषा असलेलं पत्रक तयार करून दैनिक केसरीमध्ये तशी बातमीही प्रकाशित झाली होती.

‘ज्ञानेश्वरदर्शन’ ग्रंथाच्या मुखपृष्ठावर संत ज्ञानेश्वराचं चित्र छापायचं ठरलं. तेव्हा उपलब्ध असलेली संत ज्ञानेश्वरांची बहुतेक चित्रं पगडी आणि अंगरखा घातलेली होती. ज्ञानेश्वर हे संन्यस्त प्रवृत्तीचे असल्याने त्यांना हा पोषाख शोभणार नाही, असं सरदार नानासाहेब मिरीकर यांना वाटलं. संन्याशाच्या मुलांना साधी वस्त्रं मिळणं जिथं कठीण, तिथं जरीचा पितांबर, शाल दाखवणं योग्य होणार नाही. त्याऐवजी त्यांची संन्यस्त वृत्ती, जटा, चेहऱ्यावरचं दिव्यत्व या गोष्टी नजरेसमोर ठेवून चित्रं रेखाटावं, अशी नानासाहेबांची कल्पना. त्यांनी ही कल्पना चित्रकार मित्र रघुनाथ हरी आफळे यांना सांगितली आणि आपल्यासमोर बसवून ते चित्र काढून घेतलं. हे चित्रं सर्वांनाच आवडलं. नंतर संत ज्ञानेश्वरांवर निघालेल्या चित्रपटांतही हेच रूप पहायला मिळालं. आफळे हे प्राथमिक शाळेत साधे शिक्षक असले, तरी उत्तम कलावंत, फोटोग्राफर, वैद्य आणि ज्योतिषीही होते. त्यांनी केवळ कोळसा वापरून काढलेलं शिर्डीच्या साईबाबांचं अस्सल चित्र मिरीकर वाड्यात आहे.

ग्रंथराज ज्ञानेश्वरीची यथार्थ ओळख करून देणारा ‘ज्ञानेश्वरदर्शन’ हा ग्रंथ वाङ्मयोपासक मंडळानं नेवाशात १९३४ मध्ये झालेल्या संमेलनात प्रकाशित केला. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणार्या सर्व विद्वानांचे लेख मिळवून ते प्रकाशित करण्याचं शिवधनुष्य केशवराव टेंभुणीकर यांनी यशस्वीरित्या पेललं. या ग्रंथातील लेखांची जळणी करून छापण्यापर्यंतची सर्व कामगिरी कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष त्र्य. ग. धनेश्वर आणि सेनापती दादा चौधरी यांच्यावर सोपवण्यात आली. हा ग्रंथ मोहन मुद्रा मंदिर या तेव्हाच्या नगरमधील सर्वात आधुनिक छापखान्यात छापला गेला. नागरिकांनी देणग्या देऊन या उपक्रमासाठी मदत केली. मंडळाचे अध्यक्ष रावबहाद्दूर नरहर बाळकृष्ण ऊर्फ अप्पासाहेब देशमुख यांनी स्वतः १५०० रूपयांची देणगी दिली होती.

नेवाशात झालेल्या वाङ्मयोपासक मंडळाच्या संमेलनाला अध्यक्ष म्हणून लक्ष्मणराव पांगारकर लाभले होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष सरदार नानासाहेब मिरीकर होते. महाराष्ट्रांतील सर्व प्रमुख साहित्यिक  उपस्थित राहिल्यामुळे हा सोहळा अपूर्व ठरला.

वाङ्मयोपासक मंडळाच्या आमंत्रणावरून १९३९ मधील ‘महाराष्ट्र साहित्य संमेलन’ नगर येथे महामहोपाध्याय दत्तोपंत पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली भरलं. स्वागताध्यक्ष होते रावबहादूर न. वा. देशमुख आणि कार्याध्यक्ष होते रावबहाद्दूर बाबासाहेब हिवरगावकर (संसदपटू प्रा. मधू दंडवते यांचे वडील). सरचिटणीस दत्तोपंत डावरे, पटवर्धन, भोगे, पंडित आणि शरदिनी वेदक यांनी हे संमेलन यशस्वी होण्यासाठी अविश्रांत मेहनत घेतली. या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं भरवलेल्या चित्रकला प्रदर्शनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ चित्रकार र. बा. केळकर होते, तर अध्यक्ष शं. वा. किर्लोस्कर होते. ग्रंथालय आणि वाचनालयांच्या कार्यकर्त्यांची परिषदही यावेळी झाली. या परिषदेचे स्वागताध्यक्ष कुंदनमल  फिरोदिया होते, तर अध्यक्षस्थान मराठीतले नामवंत विनोदी साहित्यिक चिं. वि. जोशी यांनी भूषवलं होतं. नगरला संमेलनाचा मान मिळावा म्हणून मंडळाच्या आद्य संस्थापकांपैकी असलेले गोपाळराव गायकैवारी आणि धनेश्वर यांनी विशेष खटपट केली होती.

नेवासे येथे ज्ञानदेव विद्यापीठ उभारावं, अशी वाङ्मयोपासक मंडळाची इच्छा होती. त्याकरितां सरदार नानासाहेब मिरीकर, धनेश्वर आणि रसाळ यांची समितीही नेमण्यात आली होती. ज्ञानेश्वरीची पाठशुद्ध आवृत्ती तयार करून छापण्याचं काम या समितीकडे सोपवण्यात आलं होतं. १९५३ मध्ये धनेश्वर हे या मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी या पाठशुद्ध आवृत्तीचा पूर्व खंड अध्याय १ ते ९ तयार करून संत ज्ञानेश्वरांच्या पुण्यतिथीच्या दिवशी तेव्हा आमदार असलेले बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते प्रकाशित केला. पुढील खंडाची तयारी चालू असून तोही लवकरच प्रसिद्ध होईल, असं त्यावेळी जाहीर करण्यात आलं होतं.

वाङ्मयोपासक मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणून गो. रा. गायकैवारी, बाबासाहेब हिवरगावकर, शं. वा. आंबेकर आणि वेणूबाई मोडक यांनी काम केलं. चिटणीस म्हणून प. प. पटवर्धन, दत्तोपंत डावरे आणि सरदार बाबासाहेब मिरीकर यांनी बरीच वर्षे काम केलं.

वाङ्मयोपासक मंडळाचा एक उद्देश ऐतिहासिक ग्रंथांचे संशोधन करणं हा होता. ज्याप्रमाणे मंडळानं ‘ज्ञानेश्वर मंडळ’ नेमलं, त्याचप्रमाणे ‘इतिहास संशोधन मंडळ’ असंही एक पोटमंडळ स्थापन केलं. १५ मार्च १९५३ रोजी प्रा. कृ. दा. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली या पोटमंडळाचं उदघाटन झालं. हे इतिहास संशोधन मंडळ पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळाशी संलग्न होतं. या मंडळाची कचेरी मिरीकर वाड्यात सरदार बाबासाहेब मिरीकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती. पुढं याच मंडळींनी नगरला ऐतिहासिक वस्तु संग्रहालयाची स्थापना केली.

०००

  • भूषण देशमुख, अहिल्यानगर, ९८८१३३७७७५