अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखक – प्रकाशकांचा विशेष सन्मान

नवी दिल्ली दि. २२ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत साहित्यासाठी  दिलेल्या योगदानाबद्दल विशेष सन्मान समारंभ पार पडला. यावेळी सुप्रसिद्ध लेखिका आणि संशोधक संजीवनी खेर तसेच, मराठी प्रकाशन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या डायमंड पब्लिकेशन्सचे श्री दत्तात्रय पाष्टे व श्रीमती कमल पाष्टे यांचा अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या  अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

 श्रीमती संजीवनी खेर या ऐतिहासिक स्त्रियांच्या जीवनावर आधारित संशोधनपर आणि व्यक्तिचित्रणात्मक साहित्य लेखनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांची अनेक पुस्तके मराठी साहित्याच्या समृद्ध परंपरेत महत्त्वपूर्ण ठरली आहेत. पत्रकार, लेखिका आणि इतिहास अभ्यासक या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी भरीव कार्य केले आहे. त्यांच्या योगदानाची दखल घेत अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या वतीने त्यांना विशेष सन्मान प्रदान करण्यात आला.

 डायमंड पब्लिकेशन्सचा गौरव

२००५ साली स्थापन झालेल्या डायमंड पब्लिकेशन्सने ९५० हून अधिक अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण पुस्तके प्रकाशित केली आहेत. मराठी साहित्याच्या वृद्धीसाठी आणि वाचकांना दर्जेदार साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी या संस्थेचे योगदान उल्लेखनीय आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या या महत्वपूर्ण योगदानाबद्दल श्री दत्तात्रय पाष्टे व श्रीमती कमल पाष्टे  यांचा सत्कार करण्यात आला.

 या विशेष सन्मान सोहळ्याला अनेक नामवंत साहित्यिक, संशोधक आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.