मुंबई, दि. २५ : कवी मनाचे महान योद्धे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने या वर्षीपासून दिला जाणार पहिला ‘राज्य प्रेरणा गीत पुरस्कार’ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘अनादी मी अनंत मी’… या गीताला देण्यात येत असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस समुद्र किनाऱ्यावरुन केली.
ज्या पद्धतीने महाराष्ट्र भूषण आणि अन्य सन्मानाचे पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येतात त्याच पद्धतीने दरवर्षी एका प्रेरणा गीताला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. 2 लाख रुपये रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.
छत्रपती संभाजी महाराज हे एक उत्तम साहित्यिक आणि संस्कृतचे उत्तम जाणकार होते. त्यांनी संस्कृत भाषेत ‘बुधभूषण’ हा ग्रंथ लिहिला, तर ‘नायिकाभेद’, ‘नखशीख’ आणि ‘सातसतक’ हे ब्रज भाषेत ग्रंथ लिहिले आहेत. त्यामुळेच त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्र शासन यावर्षी पासून एका प्रेरणा गीताचा सन्मान करणार आहे.
जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास एक मोठा संघर्ष असतो. या संघर्षात संकटसमयी मनाला उभारी देण्याचे काम काव्य पंक्ती करतात, जगण्याला प्रेरणा देतात. म्हणून अशा प्रेरणा गीतांचा सन्मान व्हावा तोही आपल्या स्वराज्यासाठी अफाट संघर्ष करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे व्हावा अशी यामागची कल्पना असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.
सावरकर पॅरिसहून लंडनला रेल्वेने आल्यावर ब्रिटिश सरकारने अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप करून खटला भरला. त्यांच्यावरचा खटला इंग्लंडमध्ये न चालवता हिंदुस्थानात चालवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सावरकरांना लंडनहून मोरिया बोटीने हिंदुस्थानात नेण्यात आले. ती बोट मार्सेलिसच्या बंदरात आल्यावर सावरकरांनी ८ जुलै १९१० या दिवशी ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटका करून घेऊन भारताला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा आपला लढा चालूच ठेवण्यासाठी त्यांनी समुद्रात उडी मारली. सावरकर ६० यार्ड एवढे अंतर पोहून गेले आणि त्यांनी मार्सेलिसचा किनारा गाठला, पण दुर्दैवाने ते पकडले गेले. त्यानंतर आपल्याला इंग्रजाकडून आपला अमानुष छळ होणार हे त्यांच्या लक्षात आलेच होते. त्यावेळी देशासाठी संघर्ष करण्याचे आत्मबळ पुन्हा वाढवण्यासाठी ज्या काव्य पंक्ती त्यांना स्फुरल्या त्या म्हणजे ‘अनादी मी … अनंत मी’.. हे गीत होय.”
हे गीत म्हणजे सावरकरांचे अत्यंत भेदक, प्रेरणा, उर्जा देणारे हे शब्द व ओतप्रोत देशप्रेम याला वंदन करीत हा पुरस्कार जाहीर करीत असल्याचे ॲड.आशिष शेलार यांनी सांगितले. लवकरच समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे सांगितले.
पुरस्कारासाठी समिती
या पुरस्कारासाठी सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून सांस्कृतिक कार्य विभागाच्या अपर मुख्य सचिवांसह सांस्कृतिक संचनालयाचे संचालक, गोरेगाव चित्रनगरी व्यवस्थापकीय संचालक, उपसचिव सांस्कृतिक कार्य, पु. ल देशपांडे कला अकादमी संचालक, दर्शनिका विभाग संपादक या समितीचे सदस्य आहेत. सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार हे फ्रान्स दौऱ्यावर असून, याबाबतची ऑनलाईन बैठक घेऊन यावर्षीचे प्रेरणा गीत म्हणून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या गीताची निवड एकमताने करण्यात आली असल्याचे सांगितले. या बैठकीला अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक संचालक विभिषण चवरे, चित्रनगरीच्या संचालक स्वाती म्हसे – पाटील, पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या संचालक मिनल जोगळेकर आणि डॉ. बलसेकर आदी सदस्य उपस्थित होते. हा पुरस्कार कवींना देण्यात येणार असून कवी जर हयात नसतील तर त्यांच्या नातेवाईक अथवा त्यांचा वारसा सांगणाऱ्या संस्थांना प्रदान करण्यात येणार आहे.
०००
संजय ओरके/विसंअ/