मुंबई, दि. 26 : मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि मराठी भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ उद्या 27 फेब्रुवारी रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे सायंकाळी 5 वाजता पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
मराठी भाषा गौरव दिन तसेच ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीप्रित्यर्थ आयोजित या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, विरोधी नेते अंबादास दानवे, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आदी उपस्थित राहणार आहेत.
मराठी भाषा विभागाअंतर्गत 2024 करिता विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर झाला आहे. नामवंत प्रकाशन संस्थेसाठी 2024 चा श्री.पु. भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे या संस्थेला जाहीर झाला आहे. डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार 2024 हा डॉ.रमेश सिताराम सूर्यवंशी यांना आणि श्री.मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार हा श्रीमती भीमाबाई जोंधळे यांना जाहीर झाला आहे.
याशिवाय ग्रामीण साहित्यासाठी 2023 चे पुरस्कार जाहीर झाले आहे. वाङमय पुरस्कार प्रकारात प्रौढ वाङमय अंतर्गत काव्य प्रकारामध्ये कवी केशवसुत पुरस्कार हा एकनाथ पाटील यांना ‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. नाटक / एकांकिका करिता राम गणेश गडकरी पुरस्कार हा मकरंद साठे यांना, कादंबरीकरिता हरी नारायण आपटे पुरस्कार हा आनंद विंगकर यांना, लघुकथेकरिता दिवाकर कृष्ण पुरस्कार हा दिलीप नाईक-निंबाळकर यांना, ललित गद्यकरिता अनंत काणेकर पुरस्कार अंजली जोशी यांना, विनोदाकरिता श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार हा शेखर गायकवाड यांना चरित्राकरिता न.चिं.केळकर पुरस्कार हा विवेक गोविलकर, आत्मचरित्रासाठी लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार हा डॉ.वसंत भा. राठोड यांना समीक्षा, संशोधन, सौंदर्यशास्त्र, ललितकला व आस्वादपर लेखनाकरिता श्री. के. क्षीरसागर पुरस्कार हा समीर चव्हाण यांना जाहीर झाला आहे. तसेच प्रौढ वाङमय राज्यशास्त्र अथवा समाजशास्त्रकरिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारांसाठी शिफारस नाही.
त्याचप्रमाणे प्रौढ वाङमय इतिहासाकरिता शाहू महाराज पुरस्कार हा प्रकाश पवार यांना, भाषाशास्त्र अथवा व्याकरणाकरिता नरहर कुरूंदकर पुरस्कार हा उज्ज्वला जोगळेकर यांना, विज्ञान व तंत्रज्ञानाकरिता महात्मा जोतीराव फुले पुरस्कार हा सुबोध जावडेकर यांना, शेती व शेतीविषयक पुरक व्यवसाय लेखनाकरिता वसंतराव नाईक पुरस्कार हा डॉ.ललिता विजय बोरा यांना, तसेच उपेक्षितांचे साहित्यकरीता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार हा सुनीता सावरकर यांना जाहीर झाला आहे. तर अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखनाकरिता सी.डी.देशमुख पुरस्कारांसाठी शिफारस नाही. तत्वज्ञान व मानसशास्त्रकरिता ना.गो.नांदापूरकर पुरस्कार हा या.रा.जाधव यांना, शिक्षणशास्त्राकरिता कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार हा हेमंत चोपडे यांना, पर्यावरणकरिता डॉ.पंजाबराव देशमुख पुरस्कार हा माधव गाडगीळ यांना, संपादित अथवा आधारितसाठी रा.ना.चव्हाण पुरस्कार संपादक रविमुकुल यांना, अनुवादाकरिता तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी पुरस्कार हा अनुवादक श्रीकांत अरूण पाठक यांना तर संकीर्णकरिता भाई माधवराव बागल पुरस्कार हा सुप्रिया राज यांना जाहीर झाला आहे.
वाङमय पुरस्कार प्रकारात बाल वाङमयमध्ये कवितेकरीता बालकवी पुरस्कार हा प्रशांत असनारे यांना, नाटक व एकांकिकाकरिता भा.रा.भागवत पुरस्कार संजय शिंदे यांना, कादंबरी प्रकारात साने गुरूजी पुरस्कार हा रेखा बैजल यांना, कथा प्रकारात राजा मंगळवेढेकर पुरस्कार हा शरद आपटे यांना सर्वसामान्य ज्ञानकरिता यदुनाथ थत्ते पुरस्कार हा डॉ.प्रमोद बेजकर यांना तर बालवाङमय संकीर्ण या प्रकारातील ना.धो.ताम्हणकर पुरस्कार हा डॉ.आनंद नाडकर्णी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप 50 हजार रूपये आहे.
वाङमय पुरस्कार प्रकारात प्रथम प्रकाशन अंतर्गत काव्याकरिता बहिणाबाई चौधरी पुरस्कार हा तान्हाजी रामदास बोऱ्हाडे यांना, नाटक/एकांकिकाकरिता विजय तेंडुलकर पुरस्कार हा हरीष बोढारे यांना, कादंबरी या प्रकारातील श्री.ना.पेंडसे पुरस्कार हा प्रदीप कोकरे यांना, लघुकथेसाठीचा ग.ल.ठोकळ पुरस्कार हा डॉ.संजीव कुलकर्णी यांना, ललितगद्याचा ताराबाई शिंदे पुरस्कार हा गणेश मनोहर कुलकर्णी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप 50 हजार रूपय असे आहे. तर प्रथम प्रकाशन समीक्षा सौंदर्यशास्त्र या प्रकारातील रा.भा.पाटणकर पुरस्काराकरिता शिफारस नाही.
याचप्रमाणे सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार प्रकारात सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार हा अनुवादक योगिनी मांडवगणे यांना ‘आल्बेर काम्यू ला मिथ द सिसीफ’ या पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपये आहे.