गव्हर्नर नेड लॅमांट यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक चर्चा
मुंबई, दि. २८ : नवी मुंबई परिसरामध्ये नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ व दळणवळणाच्या दर्जेदार सुविधांमुळे तिसरी मुंबई विकसित होत आहे. सर्व सुविधा लक्षात घेता नवी मुंबईत नवीन ‘एज्युसिटी’ निर्माण करण्याचा राज्य शासनाचा मानस असून त्यासाठी अमेरिकेतील केनेडीकट राज्याची मदत मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
सह्याद्री अतिथिगृह येथे कनेक्टिकट राज्याचे गव्हर्नर नेड लॅमांट व त्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान ‘ एज्यूसिटी’ उभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या ‘पॉवर हाऊस’सोबतच तंत्रज्ञान आणि करमणुक क्षेत्राचे हब आहे. देशातील एकूण परकीय गुंतवणूकीपैकी ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आहे. राज्यात देशाच्या ६० टक्के डेटा सेंटर क्षमता आहे. राज्याला २०३० पर्यंत १ हजार अमेरिकन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट राज्य शासनाने ठेवले आहे. यापैकी राज्याने सध्या निम्मे उद्दिष्ट साध्य केले आहे.
नवीन एज्युसिटीपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जवळच असणार आहे या विमानतळावरून लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार आहेत. मुंबईमध्ये पायाभूत सोयी-सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत. मेट्रो, नवीन विमानतळ, आंतरराष्ट्रीय बंदर आदी पायाभूत सोयी-सुविधांचा विकास करण्यात येत आहे. यामुळे राज्य अधिक गतीने विकसित होत आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
शिष्टमंडळात गव्हर्नर यांच्यासमवेत केनेडीकट प्रांताचे एक्झिक्यूटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट कॅथी कान्गारेल्ला, केनेडीकट विद्यापीठाचे अध्यक्ष राडेन्का मॅरीक, याले विद्यापीठाचे व्हाईस प्रोवोव्ह फॉर रिसर्च ‘ मायकल क्रेअर, पेप्सिको कंपनीच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रा नूयी, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे उपस्थित होते.
0000
नीलेश तायडे/विसंअ/