महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘माविम’ने कार्याची व्याप्ती वाढवावी- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

SPK DGIPR Mantralay Mumbai

मुंबई दि. २८ : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या कामाची व्याप्ती वाढविण्यात यावी. बचतगटांमार्फत जन सुविधा केंद्रांची देखभाल करण्याबाबत तसेच सर्व्हिस सेक्टरमध्ये रोजगाराच्या जास्तीत-जास्त संधी उपलब्ध करून देणे व शहरी भागातील महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठीच्या योजनांसंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

मंत्रालयात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी सचिव डॉ. अनुपकुमार यादव, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक वर्षा लड्डा, विभागाचे सहसचिव श्री. ठाकूर, ‘माविम’चे सहायक व्यवस्थापक श्री. गमरे, सल्लागार कुसूम बाळसराफ आदिसह अधिकारी उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, महामार्गावरील जनसुविधा केंद्राच्या देखभाल व व्यवस्थापनाची जबाबदारी महिला बचतगटांना देण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा. या सुविधा केंद्रांमध्ये शौचालये, हिरकणी कक्ष, बचतगटातील व ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रदर्शन, हस्तकला विक्री केंद्रे, अल्पोपहार यासारखे स्टॉल उभारण्याचे प्रस्तावित करावे.

बचतगटांच्या माध्यमातून ग्रामीण आणि दुर्बल घटकातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम माविम मार्फत सुरू असून, ग्रामीण आणि शहरी भागातील सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय महिलांसाठी व्यावसायिक संधी, वित्तिय जोडणी आणि मार्गदर्शन प्रभावीपणे करण्यासाठी पंडिता रमाबाई वैयक्तिक महिला अर्थार्जन योजना राबविण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही यावेळी तटकरे यांनी दिले.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/