पुणे दि. १: भोर तालुक्यातील उत्रोली येथील विक्रम दादासाहेब गायकवाड या अनुसूचित जातीमधील उच्चशिक्षित तरुणाची झालेली निर्घृण हत्या ही अत्यंत निंदनीय व मनाला क्लेश देणारी निघृण घटना असून महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने या घटनेची अत्यंत गंभीर दखल घेतली असल्याचे आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले. शांतता सलोखा टिकवणे ही शासन, प्रशासन व संपूर्ण जनतेची देखील जबाबदारी आहे, असेही ते म्हणाले.
बारामती येथे माध्यम प्रतिनिधींशी शुक्रवारी (२८ फेब्रुवारी) संवाद साधताना ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, विक्रम गायकवाड या तरुणाची दि. ८ फेब्रुवारी रोजी हत्या झाल्याची घटना घडली. त्या अनुषंगाने भोर येथे त्याचे आई, बहीण, भाऊ, काका आणि परिसरातील लोकांशी भेट घेऊन चर्चा केली. तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त गणेश बिरादर, भोर प्रांताधिकारी विकास खरात, जिल्ह्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे आणि तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक तानाजी बर्डे यांच्यासोबत बैठक घेऊन या प्रकरणाबाबत चर्चा केली.
विक्रम याच्या परिवारावर झालेला अन्याय आयोग खपवून घेणार नाही असे सांगून त्यांनी पुढे सांगितले, या प्रकरणात विक्रमच्या परिवाराने संपूर्ण पोलीस तपासावर शंका व्यक्त केली आहे. विक्रमचा नोंदणीकृत पद्धतीने विवाह झाला होता त्या मुलीच्या संपूर्ण परिवारावर विक्रमच्या कुटुंबीयांचा आक्षेप आहे. या हत्येच्या अनुषंगाने अनुज उर्फ बाबू मल्हारी चव्हाण (वय २४ वर्षे) हा आरोपी स्वतः पोलीसांसमोर हजर झाला असून पोलिसांनी त्याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले असून हाच आरोपी असल्याच्या प्राथमिक निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचलेले आहेत. तथापि, हा ‘ऑनर किलिंग’चा प्रकार असावा अशा पद्धतीची शंका घेत मृतक विक्रम गायकवाड यांच्या कुटुंबीयांनी मुलीच्या परिवारावर आक्षेप घेतला आहे.
या प्रकरणाच्या अनुषंगाने तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भरत नारायण शिवतारे यांच्याशी देखील चर्चा केली असून त्यांनी ४ ते ८ फेब्रुवारीपर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम कथन केला. यामध्ये तपासामध्ये अक्षम्य कुचराई झाल्याचे आपले निरीक्षण असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणाचा तपास स्वतः पोलीस अधीक्षक यांनी धुरा सांभाळत करावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ७ तारखेपर्यंत या प्रकरणाचा सखोल तपास करून तपशीलवार अहवाल आयोगासमोर सादर करावा, भोर उपविभागीय अधिकारी, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त तसेच जिल्ह्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांनीही आपला स्वतंत्र अहवाल सादर करावा असेही निर्देश दिल्याचे ॲड. मेश्राम यांनी सांगितले.
सामाजिक न्याय विभागाला नियमानुसार ४ लाख १२ हजार ५०० रुपयांची रक्कम विक्रमच्या आईच्या खात्यामध्ये जमा करण्याचे निर्देश देण्यात आले असून चार्जशीट दाखल केल्यानंतर पुढची उर्वरित तेव्हढीच रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. तसेच परिवारातील एका व्यक्तीस राज्य शासनाच्यावतीने नोकरी देण्यात येईल. त्या अनुषंगानेही निर्देश आजच्या आढावा बैठकीत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
0000