कोविड केअर सेंटरच्या कामकाजाची माहिती घेतली जाणून तालुक्यातील रस्ते बांधकाम,पाणीपुरवठा,कायदा सुव्यवस्थेचा आढावा
चंद्रपूर, (ब्रम्हपुरी) दि. २१ जून : ब्रह्मपुरी तालुक्यामधील कोरोना स्वॅब चाचण्या वाढविण्यात याव्यात, अशी सूचना राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केली.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची याठिकाणी बैठक घेऊन कोरोना आजारासंदर्भातील आढावा घेतला. या बैठकीला उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, नगराध्यक्ष रीता उराडे, मुख्याधिकारी मंगेश वासेकर, ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुभाष खिल्लारे, तहसीलदार विजय पवार, जिल्हा परिषदेचे उपअभियंता नन्नावरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दूधपचारे आदींची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधा उपलब्ध करताना जिल्ह्यात मोठी प्रयोगशाळा उभारण्यात आली असून गरजेनुसार व तातडी बघून नागपूर आणि चंद्रपूर येथील प्रयोगशाळेचा वापर करण्याचे सूचित केले. चंद्रपूरमध्ये पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून अडीच कोटी रुपयांची स्वॅब तपासणीची कोरोना प्रयोगशाळा उभी झाली असून या प्रयोगशाळेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील स्वॅब तपासणीचा अहवाल तातडीने प्राप्त होत आहेत. जिल्ह्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांची तपासणी गतीने होत आहे. या प्रयोगशाळेचा वापर करण्याचे देखील यावेळी त्यांनी उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांना निर्देशित केले. यावेळी खनिज निधीमधून तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या रस्ते बांधकामाचा देखील त्यांनी आढावा घेतला.