अबू आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन्ही सभागृहात मागणी

मुंबई, दि. ०४ : छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आजमी यांचा आम्ही निषेध करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच विधानसभा सदस्य अबू आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधानपरिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

दोन्ही सभागृहात निवेदन करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांना आणि त्यांच्या शौर्याला मी मानाचा मुजरा करतो. विधानसभा सदस्य अबू आजमी यांच्यासारखी माणसं शरीराने भारतात राहतात. त्यांना देशाचा इतिहास, संस्कृतीशी कसलेही देणंघेणं नाही. औरंगजेब कसा शासक होता हे जगाला माहीत आहे. अशांची भलामण करणाऱ्यांचा आम्ही धिक्कार करतो. आपला इतिहास शौर्याचा, पराक्रमाचा आहे. शंभूराजे हे महापराक्रमी तसेच उत्तम प्रशासक होते. औरंगजेबाचा खोटा इतिहास सांगण्यापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास अबू आजमींनी शिकावा, असे त्यांनी सांगितले.

०००