मुंबई, दि. ०४: सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने 3 आणि 4 मार्च रोजी विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. नूतनीकृत अकादमीमध्ये नाट्य, नृत्य आणि संगीताच्या विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

महिलांच्या कलाविष्काराला वाव – संचालक मीनल जोगळेकर

रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित या विशेष महोत्सवासंदर्भात पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर म्हणाल्या की, पारंपरिक आणि शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून महिलांच्या कलाविष्काराला वाव देण्यात आला आहे. कला अकादमीच्या या नव्या पर्वात अशा अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्याला रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर महिलांच्या कलासामर्थ्याचा हा उत्सव पुढील काही दिवस रंगत जाणार असून, यामध्ये नृत्य, नाटक, गायन आदी विविध कलारूपांचे सादरीकरण होणार असल्याचे जोगळेकर यांनी सांगितले.

पु. ल. कला महोत्सवात ‘मॅड सखाराम’ आणि बंगाली नाट्यविष्कार
3 मार्च 2025 रोजी पार्थ थिएटर्स, मुंबई यांच्यातर्फे पु. ल. देशपांडे लिखित ‘मॅड सखाराम’ या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. त्यानंतर, ‘व्यक्ती आणि वल्ली’मधील काही व्यक्तिरेखांवर आधारित अनुवादित बंगाली नाट्यविष्कार ‘आमार देखा किचू नमुना’ हे रूपांगण फाउंडेशन, मुंबई यांच्यातर्फे सादर करण्यात आले. या नाटकाचे दिग्दर्शन शिवाजी सेनगुप्ता यांनी केले होते, तर नाट्य रूपांतर आणि अनुवाद देवांशू सेनगुप्ता यांचा होता.

महिला कला महोत्सवात लावणी आणि शास्त्रीय युगलगायनाने रंगत
4 मार्च 2025 रोजी महिला कला महोत्सवात रेश्मा मुसळे परितेकर, योगिता मुसळे, अश्विनी मुसळे आणि त्यांच्या संचाने लावणी नृत्य सादर केली. या कार्यक्रमाला आशाताई मुसळे आणि सुलोचना जावळकर यांच्या गायनाने रंगत आणली, तर कृष्णा मुसळे (ढोलकी), विठ्ठल कुडाळकर (तबला) आणि सुधीर जावळकर (हार्मोनियम) यांनी संगत दिली. त्यानंतर, विदुषी अपूर्वा गोखले आणि विदुषी पल्लवी जोशी यांच्या शास्त्रीय युगलगायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अनंत जोशी (पेटी) आणि अभय दातार (तबला) यांनी त्यांना साथ दिली.
यावेळी आपली भावना व्यक्त करताना लावणी नृत्यांगना श्रीमती रेश्मा मुसळे म्हणाल्या की, लोककलेला आणि लोककलांवतांना रसिकांकडून मिळणारी दाद ही नक्कीच सुखावणारी आणि लाखमोलाची असते.
चित्रप्रदर्शनाचेही आयोजन
रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे 2 मार्च ते 15 मार्च 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील नामांकित चित्रकार, सुलेखनकार आणि शिल्पकार यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत हे प्रदर्शन खुले असणार असून, मुंबईकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी केले आहे.
०००
संजय ओरके/विसंअ