मुंबई, दि. ६ : कायमस्वरूपी संघर्षात्मक भूमिका ही लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना विरोधाभासी आहे. हे शाश्वत तत्व आपला शासन सिद्धांत असले पाहिजे, जे सध्याच्या आणि भविष्यातील नेत्यांना मार्गदर्शन करतील. लोकशाही मूल्यांशी बांधिलकी जपल्यास, भारत उच्च गौरव शिखरावर पोहोचेल, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.
माजी केंद्रीयमंत्री मुरली देवरा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित मुरली देवरा मेमोरियल डायलॉग्ज कार्यक्रमाच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल सी.पी राधाकृष्णन, उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ.सुदेश धनखड, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार मिलिंद देवरा, खासदार अशोक चव्हाण, अमृता फडणवीस, हेमा देवरा, कोटक बँकेचे राघवेंद्र सिंग तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या संवाद मालिकेचा उद्देश सार्वजनिक धोरणे, सामाजिक न्याय आणि आर्थिक विकास यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विचारमंथन घडवून आणणे हा असून यावर्षी ‘नेतृत्व आणि सुशासन’ ही मूलभूत संकल्पना घेण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नेतृत्व आणि सुशासनाविषयी उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, नागरिकांनी त्यांच्या लोकप्रतिनिधींना उत्तरदायी धरले पाहिजे, कारण जागरूकता ही महत्त्वाची बाब आहे. शासन हे कार्यकारी यंत्रणेचे विशेषाधिकार आहे. याचे कारण म्हणजे कार्यकारी यंत्रणा लोकांसमोर आणि विधिमंडळासमोर जबाबदार असते. नेतृत्व हे एखाद्या पदाने मिळत नाही, तर ते उद्दिष्टाने प्रेरित असते. उपनिषदामध्ये म्हटले आहे की, त्यागाच्या माध्यमातूनच खरी आनंदाची प्राप्ती होते. नेत्यांनी हे तत्त्वज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे.
“सत्यमेव जयते”, हे मुंडकोपनिषदातील तत्त्व आहे. “सत्यच टिकून राहते आणि दुसरे काही नाही.” वेदातील “सर्वांनी एकत्र येऊन कार्य करावे”, हे तत्वज्ञान आपला मार्गदर्शक तारा असले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
दिवंगत नेते मुरली देवरा यांनी सेवाभावी वृत्ती जोपासली – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दिवंगत नेते मुरली देवरा यांनी सुसंवाद साधत नगरसेवक ते केंद्रीय मंत्री या पदापर्यंत सकारात्मक काम केले. त्यांनी सेवाभाव वृती जोपासत सर्वांना मदत केली. मुरली देवरा मेमोरियल डायलॉग्ज यांनी नेतृत्व आणि सुशासन हा विषय विचारात घेतला याबद्दल गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
नेतृत्व आणि सुशासन यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज यांचे नेतृत्वच समोर येते. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आम्ही काम करत आहोत. हे शासन सर्वसामान्यांचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुशासनाची सुरुवात केली. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा नावलौकिक वाढवला, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खासदार मिलींद देवरा यांनी केले.
००००