- विधानसभा लक्षवेधी
गोरेगाव झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन त्याच जागेत ; विकासकासोबत चर्चा करून लवकरच निर्णय घेणार – मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. ०७ : गोरेगाव येथील भगतसिंगनगर येथे मुंबई सागरी किनारा प्रकल्पातील उड्डाणपुलामुळे तेथील झोपडीधारक रहिवाशांचे त्याच ठिकाणी किंवा जवळपासच्या परिसरात पुनर्वसन करण्याची मागणी आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) पुनर्वसन प्रकल्पासाठी खासगी विकासकाची निवड करण्यात आली होती. हा प्रकल्प विकासक पूर्ण करू शकला नसल्याने येथील झोपडपट्टी वासियांचे पुनर्वसन रखडलेले आहे. हे पुनर्वसन पुन्हा त्याच जागेत करण्यासाठी विकासकासोबत चर्चा करून यावर योग्य निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
याबाबत सदस्य विद्या ठाकूर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी चर्चेमध्ये सदस्य योगेश सागर, सना मलिक यांनी सहभाग घेतला.
मंत्री सामंत म्हणाले, या पुलाच्या मार्गरेषेत पाया व पोहोच रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या खासगी जागेवरील ५४० झोपडीधारकांचे पूनर्वसन करण्याकरित्ता व पर्यायी जागेकरिता घरे उपलब्ध करुन देण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाशी पत्रव्यवहार करण्यात येत असून त्याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे हाती घेण्यात आलेल्या वर्सोवा-दहीसर-भाईंदर या किनारी रस्त्याचा पुल हा महत्वाचा भाग आहे. याकरिता बाधित होणाऱ्या नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान न करता त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात पूर्ण काळजी घेऊन हा प्रकल्प पूर्ण करण्याचा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
०००
शैलजा पाटील/विसंअ
परभणी शहरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी जागा देण्यात येणार – मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. ०७ : परभणी शहरात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. हा पुतळा उभारण्यासाठी महानगरपालिकेच्या कोर्टाच्या पिटीशनच्या बाहेरील जागा असल्यास, त्यावरील अतिक्रमण पूर्ण पडताळणी करून तात्काळ काढण्यात येऊन जागा पुतळ्यासाठी देण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
याबाबत डॉ. राहुल पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. यावेळी चर्चेमध्ये सदस्य रोहीत पवार यांनी सहभाग घेतला.
मंत्री सामंत म्हणाले की, परभणी शहर महानगरपालिकेच्या हद्दीमधील स्टेडीयम कॉम्लेक्स येथील स्टेडियममध्ये जाण्याकरिता असलेल्या मुख्यप्रवेशद्वारा जवळील जागेत ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणेबाबत महानगरपालिका सर्वसाधारण ठराव दि. २६ ऑगस्ट २०१९ रोजी पारित करण्यात आला आहे. ही जागा ताब्यात असलेल्यांनी या जागेकरिता जिल्हा न्यायालय, परभणी येथे दिवाणी दावा दाखल केला असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
०००
भिवंडी बाह्य वळण रस्ता भूसंपादनाबाबत बैठक घेणार – उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. ०७: भिवंडी शहराच्या विकासाच्या दृष्टीने बाह्य वळण (रिंगरोड) महत्त्वाचा आहे. या रस्त्याच्या भूसंपादनाबाबत येथील स्थानिकांसमवेत पुन्हा चर्चा करून व सामंजस्याने मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातील असे, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
मंत्री सामंत यांनी सांगितले की, या रस्त्याच्या कामासाठी आवश्यक जमिनीचे संपूर्ण भूसंपादन झालेले नाही. भिवंडी शहरातील रिंगरोडच्या रस्त्याच्या कामासाठी आवश्यक जमिनीच्या संपूर्ण भू-संपादनाबाबत यापूर्वी बैठका झालेल्या आहेत. या रस्त्याच्या कामासाठी ज्या भागात भू-संपादन झाले आहे त्या ठिकाणी टप्पा 1 व ज्या ठिकाणचे भू-संपादन झाले नाही तेथे टप्पा 2 असे भाग करून रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत तपासणी करून निर्णय घेतला जाईल.
या संदर्भात सदस्य रईस शेख यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
०००
एकनाथ पोवार/विसंअ
प्रदूषण करणाऱ्या उद्योग घटकांवर कारवाई होणार – मंत्री पंकजा मुंडे
मुंबई, दि. ०७ : नदी प्रदूषण हा विषय गंभीर असून राज्यातून वाहणाऱ्या नद्या या प्रदूषण मुक्त असल्या पाहिजेत. जे उद्योग घटक नदी प्रदूषण करतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल,असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये असणाऱ्या नद्या आणि त्यांचे प्रदूषित झालेले पाणी या प्रश्नांसंदर्भात सदस्य बापूसाहेब पठारे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री मुंडे म्हणाल्या, नद्यांच्या प्रदूषणाचा विषय अत्यंत गंभीर असून यासाठी एकत्रित आराखडा तयार करण्याची गरज आहे. यासाठी पर्यावरण विभाग, नगरविकास विभाग आणि जलसंपदा विभाग यांचा टास्क फोर्स गठीत करण्याची गरज असल्याचे मत मंत्री मुंडे यांनी व्यक्त केले.
मंत्री मुंडे म्हणाल्या की, प्रदूषण नियंत्रणासाठी नवीन तंत्रज्ञान अवगत करणे आवश्यक आहे. यासाठी पर्यावरण विभागामार्फत नुकतेच आयआयटी मध्ये एक कार्यक्रम घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य जयंत पाटील व भीमराव तापकीर यांनी सहभाग घेतला.
०००
एकनाथ पोवार/विसंअ