महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठीचा अर्थसंकल्प – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. १०:  महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधणारा आणि समाजातील सर्व घटकांना विशेषत: महिला व बालके, ग्रामीण तसेच वंचित घटकांना न्याय देणारा यंदाचा अर्थसंकल्प आहे. मुलींचा जन्मदर वाढविणे, शिक्षणास चालना देणे, कुपोषणाचे प्रमाण कमी करून बालविवाह रोखण्याठी लेक लाडकी या योजनेची अंमलबजाणी करण्यात येते. आतापर्यंत १ लाख १७ हजार ३९० मुलींना या योजनेचा लाभ घेता आला आहे. जास्तीत जास्त मुलींपर्यंत ही योजना पोहोचवून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ५० कोटी ५५ लाख रूपये या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सन २०२५-२६ मध्ये या योजनेकरीता ३६ हजार कोटी रूपये नियतव्यय प्रस्तावित आहे. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग महिला बचतगटांच्या सहाय्याने क्रेडिट सोसायटी सुरू करण्यासाठी करण्यात येईल. अशा सर्व वैयक्तिक लाभार्थी योजना गतीमान, कार्यक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी डीबीटी पद्धत राबविण्यात येणार आहे.

आद्य शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगांव (जि. सातारा) येथे त्यांच्या कार्यास साजेसे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. महिला ,बालके, यांच्या अन्न सुरक्षा, निवारा,पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सेवा, शिक्षण सुविधा आणि रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून, त्यादृष्टीने राज्याचे आरोग्याचे धोरण जाहीर करण्यात येणार आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/