मुंबई, दि. १०: अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारताच्या दिशेने नेणारा आणि महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न साकारणारा असून देशाला जागतिक अर्थव्यवस्थेत तिसऱ्या स्थानावर नेण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याची प्रतिक्रिया पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या. विकासाकडे जाताना रोजगार संधीवर भर देणारा अर्थसंकल्प असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला. हा अर्थसंकल्प शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि सामाजिक विकास या पंचसूत्रीला चालना देणारा आहे. शेती, शिक्षण, सिंचन, महिला, आरोग्य, पायाभूत सुविधा, शिक्षण, मनुष्यबळ विकास, दळणवळण, पर्यटन, सांस्कृतिक आणि उद्योग या सर्वच क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी, महिला, युवा, अनुसूचित जाती, आदिवासी, इतर मागासवर्ग, दिव्यांग या सर्व घटकांना अर्थसंकल्पात न्याय देण्यात आला आहे. महिलांना लखपती दिदी व लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून आत्मनिर्भर करण्याचा राज्य शासनाचा संकल्प आहे, असे मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.
मराठवाड्याला लाभ
अर्थसंकल्पात पशुसंवर्धन, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागास भरीव तरतूद करण्यात आली आहे. तसेच कोकणातील उल्हास व वैतरणा खोऱ्यातील 54.70 टीमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रकल्प हाती घेण्यात येणार असून या प्रकल्पामुळे माझ्या मराठवाड्यातील सुमारे 2 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनाला मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. तसेच बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्यात 4 हजार 300 कोटींचा बांबू लागवड प्रकल्प शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे, असेही मंत्री मुंडे यांनी सांगितले. या विकासाभिमुख अर्थसंकल्पाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील त्यांनी अभिनंदन केले आहे.
०००
नंदकुमार वाघमारे/विसंअ/