ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प – मंत्री जयकुमार गोरे

मुंबई दि. १०: राज्यातील सर्व घटकांना विकासाची संधी देणारा आणि पायाभूत सुविधांसह ग्रामीण भागातील सुविधांना बळकटी देत ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा – २ अंतर्गत सन २०२४ -२५ करिता २० लाख घरकुलांच्या उद्दिष्टापैकी सुमारे १८ लाख ३८ हजार घरकुलांना मंजुरी दिली असून १४ लाख ७१ हजार लाभार्थीना पहिल्या हप्त्यासाठी २ हजार २०० कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. ही योजना राबविण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे.

लोकप्रतिनिधी आणि लाभार्थीच्या मागणीला प्रतिसाद म्हणून राज्य शासनाकडून या योजनेच्या अनुदानात ५० हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. या सर्व घरकुलांच्या छतावर सौर उर्जा संच बसविण्यात येणार आहेत.

दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत  २२ लाख महिलांना “लखपती दिदी” होण्याचा मान मिळाला असून सन २०२५-२६  मध्ये आणखी २४ लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट आहे.

“मुख्यमंत्री शाश्वत समृद्ध पंचायत राज अभियान” राज्यात राबविण्यात येणार असून त्यात भाग घेणाऱ्या अत्युत्कृष्ट ग्रामपंचायतींना तालुका पातळीपासून राज्य स्तरापर्यंत पुरस्कार देण्याचे प्रस्तावित आहे.

नवी मुंबईत उलवेमध्ये १९४ कोटी १४ लाख रुपये किंमतीच्या “युनिटी मॉल”चे काम प्रगतीपथावर आहे.

तसेच  बचतगटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक “उमेद मॉल” उभारण्याचे शासनाने ठरवले असून पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यांसाठी १५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अशा विविध योजनांद्वारे ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक प्रगतीसह , सोयीसुविधांची उपलब्धता देणाऱ्या अर्थसंकल्पाचे ग्रामविकास मंत्री गोरे यांनी स्वागत केले.

०००

वंदना थोरात/विसंअ/