छत्रपती संभाजीनगर, दि. १० (जिमाका): शासनाच्या गुंतवणूक धोरणास गुंतवणुकदारांचा प्रतिसाद सकारात्मक आहे. राज्यात गुंतवणुकीत सध्या छत्रपती संभाजीनगर विभाग अग्रेसर आहे. गुंतवणुकदारांना विविध सेवा- सुविधांची आवश्यकता असते, त्या देण्यासाठी प्रशासन तत्पर असेल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज येथे केले.
छत्रपती संभाजीनगर विभागीय गुंतवणूक परिषद हॉटेल रामा येथे पार पडली. उद्योग विभागाचे सहसंचालक बी. टी. यशवंते, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी अमित भामरे, मैत्री चे नोडल अधिकारी तथा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी बी. एम. औटी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक स्वप्नील राठोड, मसीआ चे अध्यक्ष चेतन राऊत आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त गावडे म्हणाले की, या परिषदेत राज्यातील आणि विभागातील गुंतवणुकदार सहभागी झाले आहेत. गुंतवणुकीत वाढ होत आहे, हे एक चांगले लक्षण आहे. आपल्या विभागात वाहन उद्योगात गुंतवणूक वाढत आहे. बीड, धाराशिव या भागात पवन ऊर्जा, सौर ऊर्जा क्षेत्रात वाढ होत आहे. सर्व गुंतवणुकदारांना शासनाचे विविध विभाग सेवा देण्यासाठी तत्पर आहेत. त्यासाठी प्रशासन क्षमता बांधणी करत आहेत. सर्व उद्योजकांचे स्वागत करतांना उद्योग उभारणी सुकर करण्यासाठी प्रशासन बांधील आहे. याशिवाय गुंतवणुकदार वाढल्यामुळे औद्योगिक वसाहतीचे क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात अर्धनागरी भागात निर्माण होणारे रस्ते, पाणी, घन कचरा व्यवस्थापन असे नागरी प्रश्न सोडविण्यासाठी प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. जेणेकरून त्या त्या भागात रहिवासास असणाऱ्या कामगार, कर्मचाऱ्यांना चांगल्या नागरी सुविधा मिळाव्या. आपल्या सर्व प्रश्न, समस्यांवर चर्चा, समन्वयातून मार्ग काढु असेही गावडे यांनी सांगितले.
बी.टी. यशवंते यांनी प्रास्ताविकात माहिती दिली की, आतापर्यंत २१८ गुंतवणुकदारांनी ६०३८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातील गुंतवणुकीचा समावेश केल्यास ६०६८ कोटी रुपये गुंतवणूक आहे.
बी. एम. औटी यांनी सांगितले की, मैत्री २ या पोर्टलद्वारे गुंतवणुकदारांना ११९ प्रकारच्या सेवा ऑनलाईन आणि ‘एक खिडकी’ द्वारे देण्यात येत आहेत. त्यामुळे विविध परवानग्या मिळवणे अगदी सुकर झाले आहे. त्याचाही गुंतवणुकदारांनी लाभ घ्यावा. याप्रसंगी सामंजस्य करार केलेल्या उद्योजकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. प्रविणा कन्नडकर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
०००