जनतेने जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विधानपरिषद प्रश्नोत्तरे 

***

जनतेने जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १२ : राज्यातील जनतेने जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेमध्ये केले.

सदस्य शशिकांत शिंदे यांनी टोरेस घोटाळा प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर  देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

जादा व्याज देणाऱ्या ९९ टक्के योजना या फसव्या असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोणीही अशा प्रकारे जादा व्याज देऊ शकत नाही. बँकेच्या व्याजदरापेक्षा दोन ते चार टक्के जास्ती व्याज दिले जाणे शक्य आहे. पण त्यापेक्षा जास्त किंवा भरघोस व्याज देणे कोणालाही शक्य होत नाही. त्यामुळे असे जादा व्याजाचे अमिष देणाऱ्या योजना फसव्याच असतात. त्यांच्या अमिषाला जनतेने बळी पडू नये आणि अशा फसव्या योजनांमध्ये गुंतवणूक करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

तसेच प्रश्नाला उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, राज्यातील गुंतवणूक तसेच अर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थांवर देखरेखीसाठी इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटची स्थापना करण्यात येत आहे. तसेच टोरेस प्रकरणी फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेनुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याचे शासनाचे नियोजन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १२: राज्यात एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याबाबत राज्य शासनाचे नियोजन असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

विधानपरिषदेमध्ये सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

राज्यातील अभियांत्रिकी आणि कृषी विषयक तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीमध्ये घेतल्या जात नसल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अभियांत्रिकी विषयांची पुस्तके मराठीमध्ये उपलब्ध नसल्यामुळे या परीक्षा इंग्रजी भाषेत घेतल्या जातात. पण, आता अभियांत्रिकी शिक्षणही मराठी भाषेत घेण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाची पुस्तके आता मराठी भाषेत उपलब्ध होणार आहेत. त्या अनुषंगाने अभियांत्रिकी परीक्षांचा अभ्यासक्रम मराठी भाषेत तयार करून सर्व तांत्रिक पदांच्या स्पर्धा परीक्षाही मराठीमध्ये घेण्याचे नियोजन शासनाने केले असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात दिली.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फतच्या निविदा प्रक्रियेतील  अनियमिततेबाबत एक महिन्यात चौकशी करून कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत भाडेतत्वावर बस गाड्या घेण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतील अनियमिततेची एक महिन्यात चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य राजेश राठोड यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महामंडळाच्या स्तरावर ही प्रक्रिया राबवण्यात आली. ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली असून यामुळे परिवहन विभागाचे 1700 कोटी रुपये वाचले आहेत. याबाबत एक महिन्याच्या आत चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली जाईल.

याबाबत माहिती देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रचलित पद्धतीनुसार विभागनिहाय गाड्या घेण्याची पद्धत बंद करून सर्व विभागांची तीन समूहामध्ये विभागणी करून प्रत्येक समूहात किमान 400 ते 450 याप्रमाणे सात वर्षासाठी 1310 बस गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व विभागांना केवळ एकत्रित निविदेनुसार तीन समूहात बस गाड्या पुरवण्यात येणार आहेत.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य ॲड.अनिल परब, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

प्रदूषणाच्या तक्रारींबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश   मंत्री पंकजा मुंडे

मुंबई,दि.१२ : राज्यातील प्रदूषणाच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या असून आवश्यक  उपाययोजना करण्यात येत असल्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य सुधाकर अडबाले यांनी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील प्रदूषणाबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या आठ नंबरच्या संचामध्ये प्रदूषण नियंत्रणासाठी सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. नऊ नंबरचा संच बंद करण्यात आला असून, आवश्यक दुरुस्ती केल्यानंतरच तो पुन्हा सुरू करण्यात येईल. वीज केंद्रातील इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर तपासून आवश्यक दुरुस्त्या करण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून राखेचे उत्सर्जन नियंत्रित राहील.

परळी औष्णिक वीज केंद्राच्या प्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होत असून. नियमांचे पालन न करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

राखेची वाहतूक आच्छादित (झाकून) करावी आणि त्यावर पाण्याचा फव्वारा मारला जावा, असे सक्त आदेश दिले आहेत. हे नियम न पाळणाऱ्या उद्योगांवर त्वरित कारवाई करण्यात येईल. स्थानिक नागरिकांनी जर कोणतीही नियमभंगाची तक्रार केली, तर प्रशासन तत्काळ पावले उचलणार असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.

चंद्रपूर टीपीएस (Thermal Power Station) मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. प्रदूषण नियंत्रण तंत्रज्ञान बसवण्यात येत आहे. डिसेंबर 2028 पर्यंत ही नवीन यंत्रणा कार्यान्वित होईल. हे तंत्रज्ञान बसवल्यानंतर प्रदूषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रामुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येत आहेत. नियमांचे पालन होत नसल्यास दंड आणि कारवाई केली जाईल. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पर्यावरण सुधारण्यासाठी नवीन उपाययोजना राबवण्यात येत असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

०००

राजू धोत्रे/विसंअ

 

भुसावळ शहरातील गर्दीच्या ठिकाणी पोलीस बळ वाढविणार – गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर

मुंबई, दि. १२ : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी स्वरुपाच्या घटनांवर आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांमार्फत गर्दीच्या व सार्वजनिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी नियमित पेट्रोलिंग सुरू आहे. अशा ठिकाणी पोलीस बळ वाढवून देण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य एकनाथ खडसे यांनी भुसावळ शहरात 10 जानेवारी रोजी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला.

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. भोयर म्हणाले, याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे येथे दि. 10 जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी अचानकपणे ऑलआऊट कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांवर नियमित लक्ष ठेवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सराईत गुन्हेगार व आरोपींवर मोठ्याप्रमाणावर एमपीडीए, हद्दपार तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. मुक्ताईनगर येथील घटनेच्या अनुषंगाने गुन्हेगारावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

०००

ब्रिजकिशोर झंवर/विसंअ/