विधानसभा लक्षवेधी सूचना
***
कृत्रिम व फेक पनीर विक्री विरोधात कडक कारवाई करणार; अन्न व औषध प्रशासनच्या प्रयोगशाळांना भरीव निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. १२ : फेक पनीर किंवा कृत्रिम पनीर हे निश्चितच नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याचे आहे. हे पनीर विक्री करीत असलेल्या विक्रेते व संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल. अनॉलॉग चीज च्या नावाखाली आर्टिफिशल पनीर किंवा फेक पनीर विक्रीबाबत संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच या विषयातील तज्ज्ञ व्यक्तींची बैठक घेण्यात येईल. या बैठकीत निर्णय घेऊन फेक पनीर विक्री बाबत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिला.
ॲनालॉग चीज हा पदार्थ राज्यात ॲनालॉग पनीर, आर्टिफिशियल पनीर किंवा फेक पनीर या नावाने विक्री केल्या जात असल्याबाबत सदस्य विक्रम पाचपुते यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य कैलास पाटील यांनीही सहभाग घेतला.
उपमुख्यमंत्री पवार या सूचनेच्या उत्तरात माहिती देताना म्हणाले की, खाद्यपदार्थांतील भेसळ ओळखण्यासाठी त्यांचे नमुने घेण्यात येतात. या नमुन्यांची तपासणी करून त्याचे विश्लेषण करण्यात येते. प्रयोगशाळांमधील विश्लेषणामुळे भेसळ आढळलेल्या नमुन्यांवर कारवाई करीत भेसळयुक्त पदार्थ जनतेमध्ये जाण्यापासून रोखता येतात. त्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या नवीन प्रयोगशाळा, प्रयोगशाळांचे बळकटीकरण यासाठी भरीव निधी देण्यात येईल.
फेक पनीरची विक्री, साठवणूक व वाहतुक विरोधात कारवाई करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या नियमांमध्ये सुधारणा करून ते अधिक कठोर करण्यात येतील. तसेच केंद्र शासनाच्या नियमांमध्ये बदल करण्यास संबंधित केंद्रीय मंत्र्यांची चर्चा करण्यात येवून विनंती करण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत अशा पनीर विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशाराही उपमुखमंत्री पवार यांनी दिला.
०००
निलेश तायडे/विसंअ
वसई-विरार घनकचरा व्यवस्थापनासाठी उच्चस्तरीय समिती गठीत – मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. १२: राज्यातील महानगरपालिकांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती गठीत केली जाणार आहे. वसई-विरार महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने अधिवेशन संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत समिती स्थापन केली जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
याबाबत सदस्य राजेंद्र गावित यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य योगेश सागर यांनीही सहभाग घेतला.
मंत्री सामंत म्हणाले, वसई विरार शहर महानगरपालिकेच्या गोखिवरे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास केंद्र शासनाने २०११ मध्ये मान्यता दिली होती. तसेच २०१५ मध्ये २४.६४ कोटी रुपये खर्चून प्रकल्प पूर्ण करण्यात आला. मात्र,२०२१ मध्ये चरण भट यांनी हरित न्यायाधिकरणात (एनजीटी) याचिका दाखल केली.
या प्रकरणात ३ मे २०२३ रोजी एनजीटी ने महानगरपालिकेला एप्रिल २०२० पासून प्रतिमहा १० लाख रुपये पर्यावरणीय भरपाई म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. महानगरपालिकेने या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान केले आणि १२ डिसेंबर, २०२३ रोजी न्यायालयाने या आदेशावर स्थगिती दिली. महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ ची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील असून, २०२३ मध्ये पडून राहिलेला तसेच दैनंदिन कचरा व्यवस्थापित करण्यासाठी DBFOT (Design, Built, Finance, Operate, Transfer) तत्वावर नवीन प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असल्याची माहितीही मंत्री सामंत यांनी दिली.
०००
शैलजा पाटील/विसंअ/
उमरेडजवळ प्रस्तावित कोळसा डेपोबाबत आवश्यकतेनुसार जनसुनावणी घेणार – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे
मुंबई, दि. १२: नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात गंगापूर येथे महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्यावतीने कोळसा साठवणूक व रेल्वे वाहतूक केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे. या ठिकाणी कुठलेही उत्पादन होणार नसून केवळ साठवणूक आणि रेल्वेने वाहतूक होणार आहे. तरी या कोळसा डेपोबाबत या भागातील जनभावना लक्षात घेऊन पर्यावरण विभागाच्या नियमानुसार आवश्यकतेनुसार जनसुनावणी घेण्यात येईल, असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
या कोळसा डेपोबाबत सदस्य संजय मेश्राम यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषानुसार याठिकाणी प्रदूषण नियंत्रणाचे निकषबाबत खात्री करण्यात येईल. या कोळसा डेपोमुळे या भागात कुठलेही प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. तसेच कोळसा डेपोला दिलेल्या परवानगीविषयी चौकशी करण्यात येईल. या कोळसा डेपोला ‘कन्सेंट ऑफ इस्टॅब्लिशमेंट’ दिले असून ‘कन्सेंट ऑफ ऑपरेट’ दिलेले नाही. प्रदूषण नियंत्रणाचे सर्व निकष पाळल्यानंतरच ही परवानगी देण्यात येईल. या कोळसा डेपोविषयी असलेल्या प्रश्नांची चौकशी करुन प्रदूषणामुळे जनतेला त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल.
०००
निलेश तायडे/विसंअ/
‘पीओपी’ मूर्ती संदर्भात अभ्यासगट स्थापन – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे
मुंबई, दि. १२ : प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) मूर्तींमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी विशेष अभ्यासगट स्थापन केला आहे. तसेच यासंदर्भात राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाची मदत घेण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य चंद्रकांत नवघरे, वरूण सरदेसाई यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे जलस्रोतामध्ये करण्यात येणाऱ्या विसर्जनामुळे जलप्रदूषणाच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या निर्देशासनुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपी मूर्ती विसर्जनासंदर्भात नव्याने मार्गदर्शक सूचना जारी करून या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यासंदर्भात सर्व राज्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने पीओपी मूर्तीं उत्पादन, विक्री आणि विसर्जनास बंदी घातली आहे.
पीओपी मूर्ती मधील प्रदूषणकारी घटक कमी करणे शक्य होईल का याची पडताळणी करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती गठीत करण्यात आली आहे. काही वैज्ञानिक संस्थांचे म्हणणे आहे. पीओपी मूर्तींमुळे प्रदूषण होत नाही. राज्य सरकारने यासंदर्भात वैज्ञानिक पुरावे मागवले आहेत. याचा अभ्यास करण्यासाठी आयोगाकडे विनंती करण्यात आली आहे. प्राप्त अहवाल केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (CPCB) पाठवले जातील आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून पर्यावरणपूरक आणि पारंपरिकतेला धक्का न लावता सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे त्यांनी विधानसभेत सांगितले.
०००
काशीबाई थोरात/विसंअ/
पुणेश्वरी सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांवर अन्याय होणार नाही – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. १२: पुणे येथील कसबा पेठेतील पुणेश्वरी सहकारी गृहनिर्माण संस्था ही वक्फ बोर्डाची जागा असल्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणाने दिला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात स्थानिक रहिवाशांनी न्यायालयात अपील दाखल केले असून त्यानुसार जैसे थे प्रकरण ठेवण्यात आले आहे. स्थानिक रहिवाशांवर कोणताही अन्याय होणार नाही याची शासनातर्फे पूर्ण दखल घेतली जाईल, असे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिले.
याबाबत सदस्य हेमंत रासने यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर उत्तर देताना मंत्री देसाई म्हणाले की, कसबा पेठेतील हे भूखंड १९८९ मध्ये झोपडपट्टी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. विकासकाने २०१२ मध्ये पुनर्वसन योजना सादर केली, सन २०१७ मध्ये निष्कासन करून जमीन विकासकाच्या ताब्यात देण्यात आली. मात्र, २०१९ मध्ये महाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरणाने ही जमीन वक्फ मिळकत असल्याचे घोषित करून पुनर्वसन आदेश अमान्य केले. या निर्णयाविरोधात विकासक व रहिवाशांनी सन २०२० मध्ये मुंबई उच्च न्यायालयात पुनरावलोकन अर्ज दाखल केला. त्यावर मार्च २०२० मध्ये न्यायालयाने स्टेटस क्यू (Status-Quo) आदेश दिला. दरम्यान, विकासकाकडून भाडे न मिळाल्याने पुणेश्वरी सहकारी गृहनिर्माण संस्थेने सन २०२२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली, जी सध्या न्यायप्रविष्ट आहे. जमिनीचे भूसंपादन न झाल्याने संपूर्ण पुनर्वसन प्रकल्प थांबला आहे, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.
०००
शैलजा पाटील/विसंअ/
चेंबूर लालडोंगर एसआरए प्रकल्पातील समस्यांवर तातडीने कार्यवाही होणार – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. १२: चेंबूर लालडोंगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत १० सहकारी गृहनिर्माण संस्था समाविष्ट असून, शासनाच्या मालकीच्या ३०,८५६.५० चौ.मी. क्षेत्रावर ही योजना राबवली जात आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मंजूर आराखड्यानुसार पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करण्यात आला असून, महानगरपालिकेने त्यास पूर्णत्वाचा दाखला दिला आहे. या प्रकल्पातील समस्यांवर तातडीने कार्यवाही होणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
याबाबत सदस्य तुकाराम काते यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर उत्तर देताना मंत्री देसाई म्हणाले की, या योजनेस २००८ मध्ये प्रथम आशयपत्र मिळाले, तर सुधारित आशयपत्र २०२० मध्ये देण्यात आले. योजनेत दोन पुनर्वसन इमारती व एक विक्री घटक इमारतीचे नियोजन आहे. त्यापैकी एक पुनर्वसन इमारत पूर्ण होऊन भोगवटा प्रमाणपत्र मिळाले आहे, तर दुसऱ्या इमारतीचे काम सुरू आहे. आतापर्यंत ८१३ झोपडीधारकांचे पुनर्वसन झाले आहे. इमारतींचे बांधकाम दर्जेदार असून, महानगरपालिकेच्या परवानगीनुसार सर्व आवश्यक सोयी जसे की, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, जलजोडणी, वीज व स्वच्छता व्यवस्थापन पूर्ण करण्यात आले आहे.
विकास नियंत्रण नियमावलीनुसार आठ टक्के मोकळी जागा सोडण्यात आली असून, प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वी ती हस्तांतरित केली जाईल. पुनर्वसन इमारत क्र. ३ मध्ये एक मंदिर व मस्जिद असून, संस्थेच्या विनंतीनुसार मंदिर त्याच ठिकाणी ठेवले आहे, तर मस्जिदचे आराखडे मंजूर आहेत. अस्वच्छतेच्या तक्रारींबाबत महानगरपालिकेला सूचना देण्यात येणार असून, परिसराची स्वच्छता सुनिश्चित केली जाईल. तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पाहणी करून प्रकल्पातील समस्यांवर उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.
०००
शैलजा पाटील/विसंअ/
चांदवड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याचे ऑडिट करणार – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. १२: नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात ४४ गावांची पाणीपुरवठा योजना राबविण्यात येते. सद्यस्थितीत टंचाई परिस्थितीत योजनेतून एकूण ६० गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. योजनेच्या माध्यमातून एकूण ६० गावांची पाणी मागणी ९.४५ दश लक्ष लिटर एवढी आहे. या योजनेद्वारे उपलब्ध होणारे पाणी व गळती याबाबत महिनाभरात पाण्याचे ऑडिट करण्यात येईल, असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
चांदवड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेबाबत सदस्य डॉ. राहुल आहेर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
पाणीपुरवठा मंत्री पाटील म्हणाले, योजनेतील पाणीपुरवठ्यातील तफावत दूर करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत सुधारित योजनेचे काम सुरू आहे. योजनेचे काम विहित कालावधीत पूर्ण करावे. योजनेतील पाईप लाईनवर अनधिकृत, परवानगीपेक्षा जास्त जोडण्याची चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
०००
नीलेश तायडे/विसंअ/
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमध्ये सुधारणा करणार – पणन मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. १२: कृषी उत्पन्न बाजार समितीवर असलेल्या विश्वासापोटी शेतकरी आपला शेतमाल बाजार समितीच्या परवानाधारक व्यापाऱ्यांना विक्री करीत असतो. शेतकरी हिताच्या दृष्टीने काळानुरूप बाजार समितीच्या नियमांमध्ये किंवा धोरणामध्ये सुधारणा करण्यासाठी अपर मुख्य सचिव यांच्या माध्यमातून काम सुरू आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांमध्ये शेतकरी हिताच्या दृष्टीने शासन निश्चितच सुधारणा करेल, असे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे व्यापाऱ्याने शेतकऱ्यांचे कांद्याचे पैसे न दिल्याबाबत सदस्य रमेश बोरनारे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
या सूचनेच्या उत्तरात मंत्री रावल म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीने परवाना दिलेले व्यापारी हे शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करतात. शेतकरी मोठ्या विश्वासाने या व्यापाऱ्यांना आपला शेती माल विक्री करतात. अशा व्यापारामध्ये कुठेही शेतकऱ्याचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. शेतकऱ्यांनी विकलेल्या शेतमालाचा मोबदला कायद्यानुसार त्याच दिवशी किंवा किमान पुढील सात दिवसाच्या आत देणे गरजेचे आहे.
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांचा मोबदला देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीने संबंधित व्यापाऱ्याची मालमत्ता व बँक हमी जप्त केली आहे. या बँक हमी आणि मालमत्तेच्या लिलावातून 31 लाख रुपये हे कांदा विक्री केलेल्या 118 शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला आहे. कलम 57 अन्वये व्यापाराच्या वैयक्तिक मालमत्तांची यादी करून जमीन महसूल थकबाकी कायद्यानुसार या सर्व मालमत्तांची एकत्रित लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेला गती देऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे संपूर्ण पैसे देण्यात येतील. या संपूर्ण प्रकरणात बैठकही घेण्यात येईल, असेही पणन मंत्री रावल यांनी सांगितले.
०००
निलेश तायडे/विसंअ/
दहिसरमधील ‘कंट्रोल टॉवर‘च्या स्थलांतर प्रक्रियेस गती – उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई दि. १२ : दहिसरमधील विमानचलन ‘कंट्रोल टॉवर’ च्या स्थलांतर प्रक्रियेस गती देण्यात आली आहे. त्यासाठी गोराई येथे जमीन निश्चित करण्यात आली आहे. ही जमीन संबधित विभागाच्या ताब्यात गेल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून सदस्य अमित साटम यांनी प्रश्न उपस्थित केला होता.
यासंदर्भात उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले की, दहिसर येथील टॉवरसाठी गोराई येथे जमीन देण्यात आली आहे त्याचप्रमाणे मुंबई उपनगरातील अंधेरी पश्चिम येथील डी. एन. नगर येथे एअरपोर्ट ॲथॉरिटीच्या जमिनीवर असलेल्या ट्रान्समिशन टॉवर्ससाठी जमिनीसंदर्भात समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती जागेची पाहणी करून शिफारस करेल. समितीच्या शिफारशीनंतर याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल. यासंदर्भात केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चाही करण्यात आली असून याविषयी त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.
श्री. सामंत म्हणाले, स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींच्या भावना विचारात घेत मुख्यमंत्री यांनी शासनस्तरावर हा विषय प्राधान्याने घेतला आहे. पुढील अधिवेशनापूर्वी जागा निश्चित करून स्थलांतराची प्रक्रिया सुरू केली जाईल. दहिसरचा टॉवर गोराईत हलवला जात आहे, त्याच पद्धतीने अंधेरी येथील टॉवर्स बाबतही कार्यवाही केली जाईल, असेही मंत्री सामंत यांनी सांगितले.
०००
एकनाथ पोवार/विसंअ/
सायन-कोळीवाडा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्यास कठोर कारवाई – खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. १२: सायन कोळीवाडा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाची कामे कालबद्ध मर्यादेत पूर्ण करण्यासाठी विकासकांना अंतिम नोटीस देण्यात येईल. त्यानंतरही जर कामे पूर्ण झाली नाहीत, तर संबंधित विकासकांवर कठोर कारवाई केली जाईल, असे खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.
यासंदर्भात विधानसभा सदस्य कॅप्टन आर.सेल्वन, राम कदम, मुरजी पटेल, असलम शेख यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
खनिकर्म मंत्री देसाई म्हणाले की, सायन-कोळीवाडासह बृहन्मुंबई क्षेत्रातील ५१७ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांपैकी २३३ प्रकल्पाच्या विकासकाला काढून टाकले आहे. १७ झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये विकासकाची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. तसेच विकासकांसाठी अभय योजना लागू केली असून त्याअंतर्गत विकासकांना विशिष्ट अटींसह सवलती दिल्या आहेत. तसेच उपमुख्यमंत्री कार्यालयात विशेष समन्वयक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामार्फत प्रकल्पांचा आढावा घेतला जातो. या माध्यमातून रखडलेल्या पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्यासाठी जिथे सुधारणा आवश्यक आहेत, तिथे त्वरित सुधारणा केल्या जातील आणि प्रकल्पांना गती दिली जाईल, असेही मंत्री देसाई यांनी विधानसभेत सांगितले.
०००
काशीबाई थोरात/विसंअ/
छत्रपती संभाजीनगरमधील नळ पाणी पुरवठा योजना डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करणार – उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई दि १२ : राज्यातील नागरिकांना स्वच्छ व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास राज्य शासनाने नेहमीच प्राधान्य दिले असल्याचे सांगून छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेली नळ पाणी पुरवठा योजना डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण केली जाईल, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.
यासंदर्भात सदस्य विलास भुमरे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला होता.
या लक्षवेधीस उत्तर देताना उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर शहरासाठी राबविण्यात येत असलेली नळपाणी पुरवठा योजना काही अडथळ्यांमुळे लांबली. या योजनेच्या कामाचा उच्च न्यायालय दर १५ दिवसांनी आढावा घेत आहे. न्यायालयाने केलेल्या सूचनांनुसार या योजनेची कामे केली जात आहेत. या योजनेबाबत मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांनी बैठका घेतल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगर शहराला दररोज १६६ एमएलडी पाण्याची आवश्यकता असून सध्या ९० एमएलडी पाणी पुरवठा होत असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.
०००
एकनाथ पोवार/विसंअ/
सोलापूर शहरातील विकासकामांची लोकप्रतिनिधींसमवेत पाहणी करावी – उद्योग मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. १२: सोलापूर शहरात राबविण्यात येत असलेल्या पायाभूत सुविधा व विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भात लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन महानगरपालिका व संबंधित अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.
उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. सोलापूर शहरात सांडपाणी वाहिन्या काही ठिकाणी सीव्हेज टँकशी जोडणी पूर्ण झालेली नसल्याने ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सोलापूर शहराला दर दिवशी 215 एमएलडी पाणीपुरवठा होत असून शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी अमृत 2.0 योजनेअंतर्गत आवश्यक कामासाठी य 892.42 कोटी सविस्तर प्रकल्प अहवालातील त्रुटींची पूर्तता करून अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास तांत्रिक मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.
सोलापूर शहरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत उभारण्यात येत असलेल्या दोन उड्डाणपूलांच्या भूसंपादनसाठी २९९ कोटी इतक्या रकमेच्या प्रस्तावास महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. यामधील सेक्शन एकमधील खासगी मिळकतींची भूसंपादन प्रक्रिया सुरू असून या सेक्शन मधील नऊ निवाड्यापैकी पाच निवाडे घोषित करण्यात आले आहेत उर्वरित चार निवाडे अंतिम करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तर सेक्शन दोन मधील ८४ खासगी मिळकतीच्या भूसंपादन करिता अधिसूचना निर्गमित करण्यात आल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.
यासंदर्भात सदस्य देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती.
०००
एकनाथ पोवार/विसंअ/
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अनियमिततेच्या चौकशीवरील स्थगिती उठविणार – सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
मुंबई, दि. १२ : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनियमिततेच्या चौकशीवरील स्थगिती सहकार कायदा कलम 88 अन्वये अपील सुनावणी घेऊन उठविण्यात येईल, अशी माहिती सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनियमितता प्रकरणी सदस्य गोपीचंद पडळकर यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना सहकार राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, यासंदर्भात सहकार आयुक्त यांच्या समिती मार्फत चौकशी करण्यात आली. यामध्ये नाबार्ड, सहकार कायदा व बँकेच्या पोट नियम यांचे उल्लंघन करून असुरक्षित कर्ज वाटप करण्यात आल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आले. या चौकशीस मागील काळात स्थगिती देण्यात आली होती. बँकेच्या माध्यमातून सूतगिरणी विक्री प्रकरणी कायद्यानुसार व्यवहार झाला की नाही, याची चौकशी करण्यात येईल. चौकशीत कायद्यानुसार व्यवहार झालेला नसल्याचे निदर्शनास आल्यास हा व्यवहार रद्द करण्यात येईल. तसेच बँकेतील नोकर भरती, फर्निचर खरेदी गैरव्यवहार प्रकरणी शासनाकडून चौकशी करण्यात येईल.
०००
नीलेश तायडे/विसंअ/