सातारा दि.15- डोंगरी महोत्सव अंतर्गत कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन भव्य दिव्य होण्यासाठी विविध विभागांनी समन्वयातून काम करावे, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
दौलतनगर येथील शासकीय विश्राम गृह डोंगरी महोत्सव तयारी आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जिल्हा नियोजन अधिकारी शिशीकांत माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे आदी उपस्थित होते.
या डोंगरी महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशा सूचना करून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये स्थानिक कलाकारांचा सहभाग यामध्ये गजनी नृत्य, भजन कीर्तन, पारायण यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करावे. कृषी प्रदर्शनाचे व पशुपक्षी प्रदर्शनाचे वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन करावे. त्याचबरोबर परजिल्ह्यातील डोंगरी भागातील महिला बचत गटांना या डोंगरी महोत्सवामध्ये आमंत्रित करावे व त्यांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री तसेच खाद्यपदार्थांचे मोठ्या प्रमाणात त्यांचे स्टॉल उभे करावेत.
शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे स्टॉलची उभारणी करण्यात यावी. या डोंगरी महोत्सवाला जास्तीत जास्त शेतकरी येतील यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.