सांगली, दि. १६ (जिमाका): सांगली शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी, गुन्हेगारांना कायद्याचा धाक बसवण्यासाठी व सामान्य सांगलीकरांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्यासाठी पोलीस विभागाने सतर्कतेने कामकाज करावे. जिल्ह्यातील शस्त्र परवान्यांचा जिल्हाधिकारी यांनी आढावा घ्यावा, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केल्या.
सांगली शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमिवर स्थापन करण्यात आलेल्या क्राईम टास्क फोर्सच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, सांगली शहरच्या पोलीस उपाअधीक्षक विमला एम., मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा हे बैठकस्थळी व जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
गुन्हेगारी घटना कमी होण्यासाठी, तसेच, गुन्हेगारी घटना घडू नयेत, यासाठी महानगरपालिका हद्दीत छोट्या चौक्या उभारण्यासाठी जागा निश्चिती करावी, असे सांगून पालकमंत्री पाटील म्हणाले, जिल्ह्यातील शस्त्र परवान्यांचा जिल्हाधिकारी यांनी आढावा घ्यावा. मयत तसेच गुन्हेगारी सिद्धता प्रकरणी आढावा घेऊन संबंधितांचे शस्त्र परवाने रद्द करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. पोलीस विभागाने सायबर क्राईम शाखा, दामिनी पथक, निर्भया पथक यांना अधिक मजबूत करावे. पुढील आर्थिक वर्षात महाविद्यालयात गस्तीसाठी महिला पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दुचाकी देणे व गुन्हे अन्वेषणासाठी अद्ययावत यंत्रणा उपलब्ध करून देण्याबाबत विचार केला जाईल, असे ते म्हणाले.
अतिरीक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी पोलीस विभागाची कामगिरी, गुन्हेगारी घटनांचा आढावा सादर केला.
०००