नागपूर, दि. १८ : आपल्या महानगराची संस्कृती व येथील सर्व धर्मियांमधील सौहार्दता आजवर शांततेला जपत आलेली आहे. आपली परंपरा शांतता व संहिष्णूतेची आहे. या समृध्द वारसाला गालबोट लागू नये यासाठी सर्व जनतेने काळजी घेतली पाहिजे. आपल्या सर्व समाजबांधवांनी ही सौहार्दता व शांततेच्या संस्कृतीला जपण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
शहरातील महाल भागात सोमवारी, १७ मार्च रोजी रात्री अचानक घडलेल्या घटनेनंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी नागपूर येथे पोलीस आयुक्त कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या आढावा बैठकीस पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या घटनेवर पूर्ण लक्ष ठेवून आहेत. जखमी पोलीस अधिकारी-कर्मचारी, नागरिक यांच्या कुटुंबियांची त्यांनी विचारपूस केली असल्याचे ते म्हणाले. नागपूरसह राज्यात अन्यत्र अशा घटना घडणार नाही याची काळजी राज्य शासन घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दोन गटातील तणावाला रोखण्यासाठी पोलिसांनी ढाल बनून आपले कर्तव्य बजावले. त्यांच्या कर्तव्य तत्पर भूमिकेमुळे परिस्थिती वेळीच आटोक्यात आली असून शासन पोलीसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांच्या समजंस भूमिकेमुळे नागपूर अवघ्या काही तासातच पूर्व पदावर आले असून भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.
या घटनेला जे जबाबदार आहेत त्या समाज कंटकांना पोलिस लवकरच शोधून काढतील. सोशल मिडीयावर याबाबत ज्यांनी कोणी वातावरण बिघडविण्याचे काम केले आहे अशा गुन्हेगारांना शोधून काढण्यासाठी पोलीस अधिक तपास करतील. सी.सी.टि.व्ही.कॅमेरामध्ये जे फूटेच आहे ते तपासून घेतल्या जाईल असे त्यांनी सांगून कोणऱ्याही स्थितीत नागपूरच्या शांततेला या पूढे गालबोट लागणार नाही यासाठी सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. या घटनेत ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांचे तत्काळ पंचनामे सुरु झाले असून जिल्हा प्रशासनाला सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
रुग्णालयात जाऊन जखमी पोलीस अधिकारी व काही नागरिकांच्या कुटुंबियांची घेतली भेट
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी न्यु ईरा हॉस्पिटल येथे आज आढावा बैठकीनंतर भेट देऊन जखमी पोलीस अधिकारी व नागरिकांची विचारपूस केली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार प्रविण दटके, पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आमदार प्रविण दटके यांनी उपस्थित जखमी रुग्णांच्या नातेवाईकांशी पालकमंत्री बावनकुळे यांच्या समवेत संवाद साधून दिला. उपचाराबाबत कोणतीही कमी पडू नये याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाला दिले.
या घटनेत जवळपास 33 पोलीस अधिकारी-कर्मचारी व 5 नागरिक जखमी झाले असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले आहेत. सद्यस्थितीत चार व्यक्तींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
००००