टीसीएस आणि एअर न्यूझीलंड यांच्यात एआय-सक्षम परिवर्तनासाठी भागीदारी

मुंबई, दि. १९: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि एअर न्यूझिलंड यांनी पाच वर्षांची भागीदारी जाहीर केली आहे. या कराराअंतर्गत, टीसीएस एअरलाइनच्या डिजिटल पायाभूत सुविधा सुधारणार असून, एआय-सक्षम नवकल्पना आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी सहाय्य करणार आहे. या सहयोगामुळे एअर न्यूझीलंडच्या डिजिटल क्षमता वाढणार असून, प्रवासी अनुभव सुधारेल आणि तांत्रिक कार्यक्षमता मजबूत केली जाईल. यामध्ये फ्लिट मॅनेजमेंट, क्रू शेड्युलिंग आणि ग्राउंड सर्व्हिसेस यांसारख्या प्रमुख सेवा क्षेत्रांचा समावेश आहे.

मुंबईतील टीसीएस येथे झालेल्या कराराच्या औपचारिक घोषणेसाठी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सन, टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन, एअर न्यूझीलंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग फोरन आणि टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. कृतिवासन आदी उपस्थित होते.

न्यूझीलंडचे क्रिस्टोफर लक्सन म्हणाले की, टाटा समुहाने भारताच्या विकासात आणि उद्योगांच्या वृद्धीमध्ये मोठा प्रभाव टाकला आहे. न्यूझीलंड आंतरराष्ट्रीय स्तरावर गुंतवणुकीसाठी उत्सुक आहे. न्यूझीलंड आणि भारत या दोन देशांमधील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

टाटा समुहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्था अतिशय वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर रस्ते, ग्रामीण भागातील सुविधा, गोदामे, बंदरे, सुविधा केंद्रे, विमानतळ, रूग्णालये आणि शाळा यांची गरज आहे. उत्पन्नाच्या संधी वाढत असून ही वाढ बऱ्याच काळ सुरू राहणार आहे. त्यामुळे न्यूझिलंड आणि भारत यांच्यातील व्यापार वाढेल आणि यात भारत सक्रिय सहभाग घेईल.

एअर न्यूझीलंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग फोरन म्हणाले की, टीसीएसच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान कौशल्याचा वापर करून आम्ही ग्राहक अनुभव सुधारू, ऑपरेशन्स अधिक सुरळीत करू आणि सायबरसुरक्षा तसेच डेटा संरक्षण मजबूत करू. या भागीदारीमुळे आमच्या डिजिटल प्रवासाला गती मिळेल.

टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. कृतिवासन म्हणाले की, एअर न्यूझिलंडसोबत ही भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या नवकल्पनाशील तंत्रज्ञानाच्या मदतीने एअरलाइन ऑपरेशन्समध्ये नवीन मानके प्रस्थापित करू. ही भागीदारी जागतिक स्तरावर डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल.

एअर न्यूझीलंडला डिजिटलदृष्ट्या प्रगत एअरलाइन बनविण्याच्या उद्देशाने ही भागीदारी करण्यात आली असून एआय, ऑटोमेशन आणि क्लाउड तंत्रज्ञानाच्या मदतीने एअरलाइनच्या कार्यपद्धती सुधारल्या जातील. त्याचबरोबर प्रवाशांसाठी अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ सेवा निर्माण करण्यात येणार आहेत. टीसीएसच्या कस्टमाइज्ड डिजिटल सोल्यूशन्सच्या मदतीने कार्गो सेवा, डिस्रप्शन मॅनेजमेंट, रिटेल ऑफरिंग्स, मेंटेनन्स सिस्टीम आणि क्रू ऑपरेशन्स यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात येणार आहे.

टीसीएस ही गेल्या ३७ वर्षांपासून न्यूझीलंडमधील डिजिटल परिवर्तनासाठी विश्वासू भागीदार आहे. ऑकलंडमधील कार्यालयातून बँकिंग, रिटेल, बांधकाम, उत्पादन आणि स्थानिक प्रशासन क्षेत्रातील वीसपेक्षा जास्त प्रमुख कंपन्यांसाठी सेवा देत आहे.

एअर न्यूझीलंड दरवर्षी १५ दशलक्षाहून अधिक प्रवाशांना सेवा देते, आणि आठवड्यातून ३ हजार ४०० हून अधिक उड्डाणे पार पाडते. या नव्या करारामुळे एअरलाइनच्या डिजिटल रीटेल आणि लॉयल्टी प्रोग्रॅम मध्येही सुधारणा होणार आहे. या महत्त्वाच्या भागीदारीमुळे एआय-सक्षम डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले असून, एव्हिएशन इंडस्ट्रीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असेल.

०००

संजय ओरके/विसंअ/