विधानपरिषद लक्षवेधी
कोकण रेल्वे महामंडळाच्या विलिनीकरणाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १९: भविष्यातील प्रकल्पांसाठी तसेच आवश्यक निधीच्या तुटवड्याचे संकट सोडवण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावानुसार कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.
कोकण रेल्वे महामंडळांदर्भात विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या चार राज्यांच्या सहकार्याने झाली होती. मात्र, आर्थिक विवंचना आणि निधीअभावी महामंडळाला भविष्यातील प्रकल्प राबवण्यात अडचणी येत असल्याने या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने महामंडळाचे भारतीय रेल्वेमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रेल्वे विभाग कोकण रेल्वेच्या विविध योजनांत मोठ्या प्रमाणात निधी गुंतवू शकणार आहे. दुहेरी रेल्वेमार्ग निर्माण करणे, अपघात प्रतिबंधक उपाययोजना राबवणे, स्थानकांचे आधुनिकीकरण आणि इतर महत्त्वाची विकासकामे वेळेत पूर्ण करता येतील.
विलिनीकरणानंतर कोकण रेल्वेचे नाव तसेच राहणार असून त्याचे स्वायत्त अस्तित्व कायम ठेवले जाईल. यासंदर्भात महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक आणि केरळ या तिन्ही राज्यांनीही या प्रस्तावाला संमती दिली असून लवकरच केंद्र सरकारकडे अंतिम प्रस्ताव कळवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
***
संजय ओरके/विसंअ/
०००
समाजमाध्यमांच्या वाढत्या वापराबाबत महाराष्ट्र नागरी सेवा नियमात बदल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १९: महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चे नियम तयार करताना तेव्हा सोशल मीडिया अस्तित्वात नसल्याने त्यात समाजमाध्यमे वापरासंदर्भात कोणताही उल्लेख नव्हता. बदलत्या काळानुसार आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, पुढील तीन महिन्यात या नियमांमध्ये बदल करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.
शासकीय कर्मचाऱ्यांकडून समाजमाध्यमांच्या वाढत्या वापरावर बंधने नसल्याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य डॉ. परिणय फुके, प्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी मांडली, त्यास मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासकीय कर्मचाऱ्यांनी समाजमाध्यमांचा उपयोग जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि सार्वजनिक हितासाठी करावा. या संदर्भात कठोर नियम तयार करण्याची गरज असून जम्मू-कश्मीर, गुजरात, अन्य राज्ये तसेच लाल बहादूर शास्त्री अकादमी यांनी यासंदर्भात तयार केलेल्या नियमांनुसार महाराष्ट्र देखील आपल्या सेवाशर्तींमध्ये सुधारणा करून समाजमाध्यमासंदर्भातील स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार आहे. या नियमांसंदर्भात पुढील तीन महिन्यात एक शासन निर्णय जारी करण्यात येईल. यासंदर्भात काही सूचना असल्यास संबंधितांनी त्या पुढील एक महिन्यात सामान्य प्रशासन विभागाकडे (सेवा) द्याव्या, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
***
संजय ओरके/विसंअ/
०००
एमपीएससी परीक्षा यावर्षीपासून यूपीएससीच्या धर्तीवर होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १९: सन २०२५ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ह्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पद्धतीप्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात घेण्यात येईल. तसेच या स्पर्धा परीक्षांचे आणि मुलाखतीचे संपूर्ण वेळापत्रक तयार करून त्यानुसार त्या घेतल्या जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विधानपरिषद सदस्य शिवाजीराव गर्जे, प्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यास मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १२ नोव्हेंबर २०२४ च्या पत्रान्वये ६१७ उमेदवाराची शासनास शिफारस केली होती. त्यातील कागदपत्रे तपासणीसाठी हजर ५४० उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आली. महाराष्ट्रातील विद्यार्थी हा यूपीएससी सोबत एमपीएससीची परीक्षा देत असतो. दोन्ही परीक्षेचा पॅटर्न वेगळा असल्याने तो आता एकसमान करण्यात येत आहे. त्याचबरोबर एमपीएससीला अधिक सक्षम करण्यासाठी नवीन पदे सुधारित आकृतीबंधाद्वारे मंजूर करण्याची कार्यवाही सुरू आहे. यापुढे वर्ग १, वर्ग २ आणि वर्ग ३ ची पदभरती अधिक गतीने करण्यासाठी आयोगाची पुनर्रचना केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
***
संजय ओरके/विसंअ/
०००
नाशिकच्या पंड्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणावर कडक कारवाई – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. १९: नाशिक येथील पंड्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचे एक गंभीर प्रकरण उघडकीस आले असून, त्यावर तातडीने कारवाई करण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
यासंदर्भात विधानपरिषद सदस्य डॉ.मनिषा कायंदे, प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यास मंत्री आबिटकर यांनी उत्तर दिले.
आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, या प्रकरणात संबंधित डॉक्टरांनी गैरवर्तन केल्याचे आणि हॉस्पिटलकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले आहे. तसेच, याप्रकरणी भारतीय न्याय संहिता अन्य कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या पंड्या हॉस्पिटलने आवश्यक परवानग्या व अन्य परवानग्या न घेता उपचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी डॉक्टर तानाजी चव्हाण आणि डॉक्टर प्रशांत शेटे यांची तात्काळ बदली करण्यात येणार आहे. तसेच 15 दिवसांच्या आत आयुक्तांमार्फत चौकशी समिती स्थापन करून या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल, असे आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी सांगितले.
***
संजय ओरके/विसंअ/
०००