विविध योजना अंमलबजावणीच्या समन्वयासाठी विभागीय आयुक्त घेणार त्रैमासिक बैठक

छत्रपती संभाजीनगर,दि.१९, (विमाका) : शासनाचे विविध कार्यक्रम, योजना यांच्या अंमलबजावणी दरम्यान निर्माण होणाऱ्या समन्वयाच्या विषयांचा आढावा विभागीय आयुक्त त्रैमासिक बैठकीत घेणार आहेत. यासंदर्भात आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले.

विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात पार पडलेल्या बैठकीस उप आयुक्त (नियोजन) विजय पवार, मुख्य वनसंरक्षक प्रमोद चंद्र लाकरा, मुख्य अभियंता व मुख्य प्रशासक लाभक्षेत्र जलसंपदा विभाग जयंत गवळी, उपसंचालक भूमी अभिलेख किशोर जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी गोरे, उपसंचालक क्रीडा व युवक कल्याण युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, सहसंचालक नगर रचना न.भा.नागरगोजे, यांच्यासह छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच विभागातील लातूर व नांदेड येथील विविध विभागांचे प्रमुख दुरदृष्य प्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.

बैठकीत माहिती देण्यात आली की, महसूल विभागस्तरावर सर्वसाधारण कार्यक्रम अंतर्गत  विविध कार्यक्रम, योजना यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करतांना उद्भवणारे समन्वयाचे विषय, जिल्हा पातळीवरील समस्यांची वेळेवर दखल घेऊन त्या आधारे कार्यक्रम, योजना यांची कालबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी  तसेच अपेक्षीत परिणाम व फलनिष्पती साध्य करण्याकरिता प्रादेशिक प्रमुख यांची किमान एक त्रैमासिक समन्वय व आढावा बैठक आयोजित करण्याची प्रथा पुनरूज्जीवित केली आहे.  शासन निर्णयान्वये विभागीय आयुक्त यांना त्यांच्या कार्यरत महसूल विभागाकरिता पदसिद्ध अतिरिक्त विकास आयुक्त म्हणून नियुक्त करण्याबाबतची बैठक आज विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाली.

महसूली विभागामध्ये प्रशासकीय विभागांकडून सर्वसाधारण कार्यक्रमांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या योजना, कार्यक्रम, कामांचा तपशील याबाबत प्रादेशिक प्रमुख यांनी वेळोवेळी विभागीय आयुक्त यांना अवगत करण्यात येणार आहे. महसूल विभागामध्ये सर्वसाधारण कार्यक्रम, अंतर्गत समाविष्ट विविध योजना, कार्यक्रम यांच्या कालबद्ध अंमलबजावणीसाठी संबंधित प्रादेशिक प्रमुख यांच्याकडून जिल्हास्तरावर उपस्थित होणारे महत्वाचे विषय संकलित करून विभागीय आयुक्त यांनी पदसिद्ध अतिरिक्त विकास आयुक्त म्हणून किमान एक त्रैमासिक आढावा बैठक आयोजित करण्यात येणार आहे. समन्वयाने करावयाच्या योजनांची अद्ययावत माहिती सोबत आणावी अशा सूचना श्री.गावडे यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.

०००००