मुंबई दि. 23. मुंबई व ठाण्यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, लाभार्थी नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना (NPH), तसेच आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तसेच कोणत्याही राज्य योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानांद्वारे अन्न धान्याचे वाटप सुरळीत सुरु असल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा मुंबईचे कैलास पगारे यांनी दिली.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना माहे जून महिन्याचे नियमित 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ प्रतिमाणसी रुपये 2 प्रति किलो दराने गहू, रुपये 3 प्रति किलो दराने तांदूळ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना तसेच अंत्योदय अन्न योजनेतील शिधापत्रिकाधारकांना 35 किलो धान्य प्रतिशिधापत्रिका रुपये 2 प्रति किलो दराने गहू व रुपये 3 प्रति किलो दराने तांदूळ वितरीत करण्यात येत असून आतापर्यंत 65 % शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वितरण करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याच्या वाटपानंतर प्रतिमाणसी 5 किलो मोफत तांदळाचे माहे जून महिन्याचे वाटप तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रतिशिधापत्रिका प्रतिमहा एक किलो डाळ या परिमाणात (तूरडाळ व चणाडाळ या दोन्हीपैकी एक डाळ एक किलो या कमाल मर्यादेत) माहे जून महिन्याचे मोफत डाळीचे वितरण करण्यात येत असून आत्तापर्यंत मोफत तांदळाचे 35 % शिधापत्रिकाधारकांना आणि 1082 मेट्रिक टन डाळीचे शिधापत्रिकाधारकांना वितरण करण्यात आले आहे.
कोरोना (Covid-19) विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांचे वार्षिंक कौटुंबिक उत्पन्न रुपये 59,000/- पेक्षा जास्त व रुपये 1 लाखापर्यंत असणाऱ्या एपीएल (केसरी) शिधापत्रिकाधारकांना गहू रुपये 8 प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो या दराने प्रतिमहा प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ याप्रमाणे 5 किलो अन्नधान्याचे जून महिन्याचे वितरण करण्यात येत आहे. आत्तापर्यंत तांदूळ 892 मेट्रिक टन आणि गहू 1535 मेट्रिक टन इतक्या अन्नधान्याचे 8 % शिधापत्रिकाधारकांना वितरण करण्यात आले आहे.
केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेज अंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत तसेच कोणत्याही राज्य योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना माहे मे व जून 2020 या दोन महिन्याच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमहा 5 किलो मोफत तांदूळ वितरित करण्यात येत आहे. आत्तापर्यंत 682 मेट्रिक टन इतक्या तांदळाचे वितरण करण्यात आले आहे. तसेच सदर योजनेअंतर्गत माहे मे व जून या महिन्याकरीता प्रति कुटुंब प्रतिमहा मोफत अख्खा चण्याचे वाटप करण्यात येणार आहे.
अन्नधान्याचा मुबलक साठा उपलब्ध असल्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना तसेच निकषात बसणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना निश्चित करण्यात आलेल्या केंद्रामधून तसेच संबंधित अधिकृत शिधावाटप दुकानांतून गर्दी न करता योजनानिहाय धान्य सोशल डिस्टन्सिंगचा वापर करुन तसेच मास्कचा वापर करुन लवकरात लवकर धान्य प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन श्री. पगारे यांनी केले आहे.