ग्रामीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

0
14

मुंबई, दि. 6 : उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातील प्रत्येक घटकाच्या विकासाच्या दृष्टीने तरतूद करण्यात आली आहे. ग्रामीण विकासाला चालना देण्याबरोबरच कृषी विकास, महिलांचे सक्षमीकरण, सिंचन, शिक्षण, आरोग्य अशा सर्वच घटकांना योग्य स्थान देणारा हा अर्थसंकल्प राज्याच्या विकासाला मोठी चालना देणारा ठरेल, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, राज्यातील ग्रामीण भागात 40 हजार किमीच्या रस्ते बांधणीसाठी ग्रामीण सडक विकास योजनेची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीचे अत्याधुनिक कार्यालय असावे यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून तरतूद करण्यात आली आहे. या योजनेतून २०२४ पर्यंत राज्यात प्रत्येक ग्रामपंचायतीला कार्यालय असेल. आमदारांना मिळणारा निधी दोन कोटी रुपयांवरून तीन कोटी रुपये केल्याने ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. ग्रामीण भागातील बचतगट चळवळीला गती देण्यासाठी बचतगटातील महिलांच्या उत्पादनांची सुमारे १ हजार कोटी रुपयांची खरेदी शासनामार्फत करण्याचा निश्चय अर्थसंकल्पात व्यक्त केला आहे. ग्रामीण भागासाठी करण्यात आलेल्या अशा अनेक तरतुदी महत्त्वाच्या असून त्या सामान्य ग्रामीण जनतेला दिलासा देणाऱ्या आहेत.

शेतीच्या विकासासाठी वॉटर ग्रीड योजना, शेतीला वीज पुरवठ्यासाठी सौर पंप, ठिबक सिंचनाची योजना, पीक विमा योजनेतील अनुदान वेळेत मिळण्यासाठी मंत्रीगटाची स्थापना हे निर्णयही महत्वाचे आहेत. ग्रामीण भागाला गेली अनेक वर्षे जोडून ठेवणारी एसटी बस सेवादेखील आता अधिक सक्षम होणार आहे. जुन्या 1600 बस बदलून नवीन बस कार्यान्वित करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील बस आता वायफायसहीत अत्याधुनिक सुविधांनीयुक्त करण्यासाठी देखील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. एकुणच आज सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प राज्यास प्रगतीच्या महापथाकडे घेऊन जाणारा आहे, असे मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

००००

इर्शाद बागवान/विसंअ/दि.6.3.2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here