जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली त्र्यंबकेश्वर परिसराची पाहणी

नाशिक, दि. २८ : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण, पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज त्र्यंबकेश्वर परिसराची पाहणी केली.


यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, श्री हरीगिरीजी महाराज, श्री रवि पुजारी महाराज आदी उपस्थित होते.  मंत्री श्री. महाजन यांनी गोदावरी नदी, गोदावरील नदीवरील घाट, नील पर्वत, बिल्व तीर्थसह विविध परिसराची पाहणी केली. तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली.


आगामी कुंभमेळ्यापूर्वी सर्व विकास कामांची पूर्तता केली जाईल. त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या साधू, महतांना आवश्यक सोयीसुविधांची पूर्तता केली जाईल. तशा सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

०००००