मुंबई, दि. 6 : कोकणच्या विकासाला प्राधान्य देऊन कोकणाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी फळबाग विकास, पर्यटन आणि मत्स्यव्यवसाय यावर विशेष लक्ष देऊन उममुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. कोकणाच्या विकासाला प्राधान्य दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानत असल्याचे अशी प्रतिक्रिया उद्योग राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे यांनी दिली.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा करण्यासोबत मुरूड येथील समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्यीकरणासाठी, रत्नागिरी- रायगड या दोन प्रमुख जिल्ह्यांना जोडणारा रेवस-रेड्डी सागरीमार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ३५०० कोटी रू. प्रस्तावित केले आहेत. तसेच कोकणातील थोर समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे, पांडुरंग वामन काणे, स्वातंत्र्यसेनानी आचार्य विनोबा भावे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चार एकत्रित स्मारकासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. हे स्मारक नव्या पिढीला स्फूर्तिदायक ठरणार आहे. त्याचसोबत राज्यातील क्रीडा विभागासाठी १२०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तालुका क्रीडा संकुलासाठी रू. ५ कोटी, जिल्हा क्रीडा संकुलासाठी २५ कोटी व विभागीय क्रीडा संकुलाकरिता ५० कोटी रु.चा निधी देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पर्यटन विभागाकरिता १४०० कोटी रू. प्रस्तावित करण्यात आले आहे. वरळी येथे आंतरराष्ट्रीय संकुल तयार करण्यात येणार आहे. उद्योग विभागासाठी सहा हजार कोटी रूपयांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे. या योजनेसाठी १५ ते ३५टक्के अनुदान देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे उद्योगांना मनुष्यबळ उपलब्ध व्हावे म्हणून ई-कॉमर्स, टेक्सटाईल क्षेत्राचे तरूणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी शासनाने विशेष तरतूद केली आहे. रोजगार, आरोग्यसुविधा, रस्ते, सुरक्षा व कृषीक्षेत्रासाठीही अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या असल्याचे कुमारी तटकरे यांनी सांगितले.
००००
काशीबाई थोरात/विसंअ