मुंबई, दि. ०४: जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यामुळे विकसित देशातील शाळांमध्ये सुरू असलेले अध्यापनाचे नाविन्यपूर्ण प्रयोग, पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञान समजून घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. या दौऱ्याचा राज्यातील शिक्षकांची अध्यापन पद्धती अधिक प्रभावी होऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाभ होईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.
समग्र शिक्षा, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्यावतीने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने चालवल्या जाणाऱ्या ‘स्टार्स’ (स्ट्रेंथनिंग टिचिंग लर्निंग अँड रिझल्टस् फॉर स्टेटस्) प्रकल्पांतर्गत राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांसाठी 22 ते 27 मार्च दरम्यान सिंगापूर येथे अभ्यास दौरा पार पडला. जागतिक सर्वोत्तम शिक्षण पद्धती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आणणे, नावीन्यपूर्ण शैक्षणिक पद्धती आणि यशस्वी प्रशासकीय पद्धतीचा अभ्यास करणे, जागतिक स्तरावरील विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक, ऐतिहासिक, भौगोलिक वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन नवीन दृष्टीकोन प्राप्त करणे व स्वत:च्या शाळेत नवीन शैक्षणिक व प्रशासकीय बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणे हा या दौऱ्याचा उद्देश होता.
शिक्षकांमध्ये नेतृत्वगुण व व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये भर देण्यात आला आहे. त्यानुसार शिक्षकांना या दौऱ्यातून आंतरराष्ट्रीय शिक्षणपद्धती विषयी थेट शिकण्याची संधी मिळाली. यामध्ये आधुनिक अध्यापन पद्धती, वर्ग व्यवस्थापन तंत्रे व नाविन्यपूर्ण प्रशासकीय पद्धतींचा समावेश होता. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई येथील सहायक संचालक (कार्यक्रम) सरोज जगताप यांच्या नेतृत्वाखाली या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) पुणे येथील उपसंचालक ज्योती शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषद शाळांमधील 48 शिक्षकांनी या अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतला.
प्रशिक्षणाचे विषय :
प्रायोगिक शिक्षण- बलस्थाने, आव्हाने, प्रकार, संरचना, शिक्षकांनी करावयाची पूर्व तयारी व यश प्राप्ती, शिक्षणातील अध्यापन शास्त्रीय दृष्टीकोन, विद्यार्थांची अध्यापनातील रूची टिकवून ठेवण्याची प्रभावी तंत्रे व विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी सहशिक्षणाचे नावीन्यपूर्ण धोरण या मुद्यांवर प्रिन्सिपल्स अकॅडमी इन्क (पीएआय), सिंगापूर या शिक्षण नेतृत्व, अभ्यासक्रम व अध्यापन शास्त्रात विशेष प्राविण्य असलेल्या संस्थेमार्फत शैक्षणिक साधनांचा वापर करत प्रशिक्षण देण्यात आले.
शाळा भेटी :
मूल्याधारित शिक्षण आणि पर्यायी मूल्यमापनासाठी ओळखली जाणारी सिंगापूरमधील सर्वांत जुन्या शाळांपैकी एक असलेल्या गण इंग सेंग शाळा तसेच डान्सस्पोर्ट आणि छायाचित्रण सारख्या जीवनकौशल्य शिक्षण कार्यक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या एजफिल्ड प्राथमिक शाळेला या दौऱ्यात भेट देण्यात आली. दोन्ही देशातील शिक्षकांनी एकमेकांशी संवाद साधून शैक्षणिक कल्पनांची देवाण घेवाण केली.
पुढील दिशा :
या प्रशिक्षणानंतर शिक्षक त्यांच्या शाळांमध्ये प्रशिक्षण व शाळाभेटीद्वारे जाणून घेतलेले नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींची अंमलबजावणी करण्यासाठी कृती योजना तयार करतील. तसेच एससीईआरटीमार्फत आयोजित होणाऱ्या पुढील शिक्षक प्रशिक्षणात आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यातून अनुभवलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचा व प्रशासकीय बाबींचा सहभाग केला जाईल.
या दौऱ्याने जागतिक स्तरावर शैक्षणिक उपक्रमांची देवाण- घेवाण करण्यासाठी मजबूत पाया घालण्यास मदत केली आहे. हा अभ्यास दौरा महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण व सकारात्मक बदल घडवेल, असा विश्वासही मंत्री भुसे यांनी व्यक्त केला आहे.
०००
बी.सी.झंवर/विसंअ