विद्यार्थ्यांचा भविष्यवेध घेऊन गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

0
8

मुंबई, दि. 6 : विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी अत्याधुनिक सुविधा असणे आवश्यक आहे.   विद्यार्थांचा भविष्यवेध घेऊन गुणवत्तापूर्ण  शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने अर्थसंकल्पात भरीव तरतूद  केली आहे. अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर दिली.

मुंबई आणि पुणे विद्यापीठात मागासवर्गीय मुला मुलींसाठी५०० निवासी क्षमतेची वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर,औरंगाबाद, मुंबई, पुणे, तसेच शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय, रत्नागिरी, कऱ्हाड, औरंगाबाद आणि शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, रत्नागिरी, पुणे, नागपूर येथील  शासकीय संस्थांमध्ये १२ उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय या संस्थेस १२५ वर्ष पूर्ण झाली आहेत. दुर्मिळ ग्रंथ व हस्तलिखित डिजिटायझेशन करण्यासाठी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयास ५ कोटीची रुपयांची विशेष अनुदान  देण्यात आले आहे. तसेच एशियाटिक सोसायटीलाही विशेष अनुदान देण्यात येणार आहे. या बाबींकरिता १ हजार ३०० कोटी नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे. पर्यटन व्यवसायासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याकरिता महाविद्यालयांमध्ये पर्यंटन  व हॉस्पिटॅलिटी  पदविका व पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस आहे. रयत शिक्षण संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त सन २०२०-२१ या अर्थिक वर्षात ११ कोटी अनुदान देण्यात येणार आहे. शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे -बालेवाडी, पुणे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी १३००कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा आणि गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळण्यास नक्कीच फायदा होईल. कोकणाचा विकासाला प्राधान्य देऊन कोकणाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे अशी प्रतिक्रिया श्री. सामंत यांनी दिली.

००००

काशीबाई थोरात  (वि. सं. अ.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here