केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’चा आढावा

  • कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ करणार आदिवासी गावांचे सूक्ष्म सर्वेक्षण

जळगाव, दि. ०७ (जिमाका): जिल्ह्यातील आदिवासी भागांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने ‘धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत २१ विभागांकडून करण्यात येणाऱ्या कामांची माहिती घेण्यात आली.

यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाला ५६ आदिवासी गाव व पाड्यांमधील मूलभूत सुविधा व विकासासाठी सूक्ष्म सर्वेक्षण आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, उपवनसंरक्षक जमीर शेख, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाचे प्रमुख डॉ.अजय पाटील, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी व संबंधित विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

राज्यमंत्री खडसे यांनी दिलेल्या महत्त्वाच्या सूचना

  • पशुवैद्यकीय सुविधा वाढविणे: सध्या असलेल्या ६ पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये सुधारणा करणे व आवश्यकतेनुसार नवीन केंद्र उभारणे.
  • कौशल्यविकास: आदिवासी विद्यार्थ्यांना गरजेच्या कौशल्यांचे प्रशिक्षण विद्यापीठाच्या अहवालाच्या आधारे देण्याचे निर्देश.
  • एलपीजी गॅस वितरण: गरजूंना गॅस कनेक्शन देण्यासाठी विशेष प्रयत्न.
  • कृषी उद्योग विकास: कृषी विभागाने प्रस्तावित ५३ शेतकरी गटांसाठी उद्योग व्यवसायाचे नियोजन करावे, ‘आत्मा’ प्रकल्पातून मदत मिळवून द्यावी.
  • जलसिंचन प्रकल्प: रावेर, यावल, मुक्ताईनगर भागातील वनक्षेत्रात जलसिंचन प्रकल्प उभारून पाणी जंगलातच मुरवण्याचे नियोजन करण्यात यावे.
  • प्रकल्पांचे कालबद्ध नियोजन: सर्व विभागांनी नियोजन ठरलेल्या वेळेत पूर्ण करावे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही येत्या काही दिवसांत विभागनिहाय आढावा घेण्याचे जाहीर केले.

०००