तोरणमाळमध्ये पर्यटन सुविधा निर्माण करण्यासाठी सर्वसमावेशक प्रस्ताव तयार करा – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. ०८: नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेले तोरणमाळ हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ असून येथे पुरेशा पर्यटन सुविधा तयार कराव्यात त्याचप्रमाणे पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी पर्यटन विभागाने सर्व समावेशक प्रस्ताव तयार करावा, असे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी निर्देश दिले.

मंत्रालयातील दालनामध्ये पर्यटन मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तोरणमाळ पर्यटनाच्या विकासाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार आमशा पडवी, विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील उपस्थित होते.

पर्यटन मंत्री देसाई म्हणाले की, तोरणमाळ हे पर्यटकांना पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसात खूपच चांगले वातावरण या परिसरात असते. या भागात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात हे लक्षात घेवून या भागात पर्यटन सुविधा वाढविण्याची गरज आहे. रस्त्यांचे नुतनीकरण आणि विस्तारीकरण, दर्जेदार निवास व्यवस्थ (होमस्टे) व हॉटेल्स, स्थानिक मार्गदर्शकांची व्यवस्था, पर्यावरणपूरक पर्यटन केंद्रांची उभारणी,ऑनलाइन माहिती व बुकिंग सुविधा या बाबत सर्व समावेशक प्रस्ताव तयार करावा.

पर्यटन मंत्री देसाई म्हणाले की, तोरणमाळमध्ये पर्यटन वाढले, तर स्थानिक आदिवासी समाजाला रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. शेतीपूरक व्यवसाय, हस्तकला विक्री, व पर्यटन सेवा यामधून स्थानिक लोकांचा आर्थिक स्तर उंचावू शकतो. शासनाच्या योजनांद्वारे प्रशिक्षित गाईड या सेवा नाचा दर्जा वाढवून या भागाला एक आदर्श पर्यटनस्थळ बनवता येईल, असेही ते म्हणाले.

०००

संध्या गरवारे/विसंअ/