क्रीडा शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्नशील – प्रा.राम शिंदे

शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन

अहिल्यानगर, दि.१३ – केवळ पुस्तकांचा अभ्यास करून नव्हे, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती घडवण्यामध्ये क्रीडा शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तरुण पिढीच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या क्रीडा शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले.

शिर्डी येथील सप्तपदी मंगल कार्यालय येथे  शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी नामदेव शिरगावकर, डॉ.अरुण खोडसकर, विश्वनाथ पाटोळे, राजेंद्र कोतकर, संजय चव्हाण, शिवदत्त ढवळे, ज्ञानेश काळे, संजय पाटील, जालिंदर आवारी, डॉ. आनंद पवार,  क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे आदी उपस्थित होते.

प्रा. शिंदे म्हणाले, क्रीडा शिक्षक विद्यार्थ्यांना शिस्त, आत्मविश्वास, संघभावना आणि नेतृत्वगुण शिकवतात. मैदानावर शिकलेले धडे हे जीवनात मोठ्या अडचणींना सामोरे जाताना उपयोगी पडतात. नियमित व्यायाम, योग्य आहार, तंदुरुस्ती यांचे महत्त्व मुलांपर्यंत पोहोचवण्याचे काम हे क्रीडा शिक्षक करत असतात. क्रीडा शिक्षक विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखून त्यांना योग्यदिशेने मार्गदर्शन करतात. अनेक खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो. मैदानावर संघर्ष करताना हार मानू नये, प्रयत्न करत राहावे, हे शिकवणारे क्रीडा शिक्षकच खरे जीवनगुरु असल्याचे ते म्हणाले.

शाळांमध्ये क्रीडा शिक्षक केवळ खेळ शिकवणारे नसतात, तर ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार असतात. त्यामुळे आजच्या तरुण पिढीला योग्य वळण लावण्यासाठी त्यांचे योगदान अतुलनीय  आहे. आजच्या धकाधकीच्या व संगणकीय युगात शरीराची हालचाल कमी झालेली आहे. खेळ व व्यायामामुळे जीवनात आनंद, उज्ज्वल भविष्य घडण्याबरोबरच आरोग्य सुदृढ राहते.  प्रत्येक नागरिक सुदृढ असेल तरच आपले राज्य व देश तरुण राहील.यासाठी प्रत्येकाने नियमित व्यायाम, योगाची सवय  अंगिकारण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या माध्यमातून विचारमंथन व्हावे. क्रीडा शिक्षकांनी संघटित होऊन त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवाव्यात. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असेही प्रा.शिंदे यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वनाथ पाटोळे यांनी केले.

यावेळी राजेंद्र कोतकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी डॉ. जितेंद्र लिंबकर, पुरुषोत्तम उपवर्त, अमोल जोशी, राजेश जाधव,अप्पासाहेब शिंदे,सुनील जाधव उपस्थित होते.

0000