मुंबई, दि. 16 : राज्यातील तमाशा आणि कलाकेंद्र कलावंतांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्यांच्या गठनाचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी घेतला आहे.
या समित्या तमाशा आणि कलाकेंद्र क्षेत्रातील फड मालक, कलाकार, वादक यांच्यासमोरील समस्या समजून घेऊन, पारंपरिक लोककला टिकवून ठेवण्यासाठी उपाययोजना सुचवतील, अशी माहिती मंत्री ॲड.शेलार यांनी दिली.
तमाशा तक्रार निवारण समितीमध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे अध्यक्ष असणार असून, तमाशा फड मालक रघुवीर खेडकर, तमाशा फड मालक गोपाळ नाना शेषेराव, फड मालक संभाजी जाधव, कलाकार मंगलाताई बनसोडे, कलाकार अतांबर तात्या शिरढोणकर, अभ्यासक गणेश चंदनशिवे, अभ्यासक खंडुराज गायकवाड व सहसंचालक सदस्य म्हणून काम पाहतील.
कलाकेंद्र तक्रार निवारण समितीमध्ये संचालक सांस्कृतिक कार्य हे अध्यक्ष असणार असून, कलाकेंद्र मालक बाळासाहेब काळे, कलाकेंद्र मालक अभिजित काळे, कलाकार रेश्मा परितेकर, कलाकार सुरेखा पुणेकर, कलाकार प्रमिला लोदगेकर, कलाकार संघटनेचे धोंडीराम जावळे, अभ्यासक प्रकाश खांडगे व सहसंचालक हे सदस्य म्हणून काम पाहतील.
या समित्यांचा कार्यकाळ 30 दिवसांचा असून, आवश्यकतेनुसार या क्षेत्रातील इतर अभ्यासक, कलाकार आणि कलाकेंद्र चालक यांनाही पाचारण करण्यात येणार आहे. या समित्यांमार्फत प्राप्त होणाऱ्या शिफारसीनुसार शासनाकडून निर्णय घेतला जाणार आहे.
0000
संजय ओरके /विसंअ/