- जलसंधारण, वृक्ष लागवडीसाठी ‘अमृतधारा’ अभियान
- जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाच्या ‘महा-राशन QR’ उपक्रम
- रस्ता सुरक्षेसाठी वाहंना रेट्रो रिफ्लेक्टीव्ह टेप बसविण्यासाठी विशेष मोहीम
लातूर, दि. १६ (जिमाका): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या सात कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. याअंतर्गत आज पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते तीन नाविन्यपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग, तलावातील गाल काढणे, विहीर पुनर्भरण आदी माधमातून जलसंधारण, वृक्ष लागवडीसाठी राबविण्यात येणारे ‘अमृतधारा’ अभियान, पुरवठा विभागाचा ‘महा-राशन QR’ उपक्रम आणि रस्ता सुरक्षेसाठी वाहनांवर रेट्रो रिफ्लेक्टीव्ह टेप बसविण्यासाठी विशेष मोहिमेचा यामध्ये समावेश आहे. या तिन्ही उपक्रमांचे पालकमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले.
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार संभाजी पाटील-निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, लातूर शहर महानगरपालिकेचे प्रभारी आयुक्त देविदास जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. सलीम शेख, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांची यावेळी उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ‘अमृतधारा’ अभियानात रेन वॉटर हार्वेस्टिंग, तलावातील गाळ काढणे, विहीर व तलाव पुनर्भरण, पाणवठे, एक व्यक्ती एक झाड मोहीम, जलतारा, बांबू लागवड, शाळा, महाविद्यालयांमध्ये जलसंधारण विषयी कार्यशाळा व जनजागृती केली जाणार आहे. ऑगस्ट 2025 दरम्यान टप्प्याटप्प्याने हे अभियान राबविले जाणार आहे. यासाठी समन्वय समित्या गठीत करण्यात आल्या असून उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था, व्यक्तींचा १५ ऑगस्ट २०२५ रोजी सन्मान केला जाणार आहे.
जिल्हा पुरवठा विभागाचा ‘महा-राशन QR’
शिधापत्रिकाधारकाला त्याला मिळणारे धान्य, दुकानाचे नाव, एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकऱ्याला अन्नाऐवजी मिळणाऱ्या थेट राक्क्मचे हस्तांतरण, रेशनकार्ड क्रमांक, ई-केवायसी आदी विविध बाबींची माहिती एकत्रित स्वरुपात उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने ‘महा-राशन-QR’ उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाचे उद्घाटनही पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते झाले.
वाहनांवर बसविले जाणार रेट्रो रिफ्लेक्टीव्ह टेप
रस्ते अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविले जात आहेत. जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुखांच्या वाहनामध्ये रेट्रो रिफ्लेक्टीव्ह टेप ठेवून त्यांच्या प्रवासा दरम्यान टॅक्टर, बैलगाडीस चिटकविण्याची विशेष मोहीम जिल्ह्यात १६ एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान राबविली जाणार आहे. निलंगा उपविभागीय अधिकारी शरद झाडके हे गेल्या काही दिवसांपासून हा उपक्रम राबवीत आहेत. आता जिल्हास्तरावर हा उपक्रम मोहीम स्वरुपात राबविला जाणार असून या मोहिमेची पालकमंत्री श्री. भोसले यांनी उद्घाटन केले.