माजलगावमधील वीज, रस्ते,आरोग्य विषयीचे समस्या गांभीर्याने घ्या – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. १६ : माजलगाव व माजलगाव विधानसभा मतदारसंघातील वीज, रस्ते आणि आरोग्य विषयीच्या समस्या गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण पाणीपुरवठा स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिल्या.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ होल्डिंग कंपनीच्या मुख्य कार्यालयात माजलगाव विधानसभा मतदारसंघातील विविध समस्यांबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे सदस्य प्रकाश सोळंके, महावितरणचे संचालक अरविंद भादीकर, महावितरणचे प्रकल्प संचालक प्रसाद रेशमे, एम एस आर डी सीचे कार्यकारी अभियंता सुनिता वनवे, अधीक्षक अभियंता सतीश साबणे, उपअभियंता अतुल कोटेच्या उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, माजलगाव परिसरात  ग्राहकांना दर्जेदार आणि अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवणे, नवीन उपकेंद्रांची उभारणी, जीर्ण झालेल्या वीजवाहिन्यांची पुनर्बांधणी करणे. आदी कामे समाधानकारक असून उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

माजलगाव मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व ग्रामीण रुग्णालयातील सुविधा, औषध साठा, डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती याबाबत चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत माजलगाव ते कैज (जि. बीड) आणि माजलगाव ते परतुर (जि. जालना) या मार्गांवर राष्ट्रीय महामार्ग ५४८ (C) अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या रस्ते विकास प्रकल्पाची सविस्तर माहिती सादर करण्यात आली.

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सर्व विभागांनी समन्वय साधत कामांची गुणवत्ता राखून नियोजित वेळेत विकासकामे पूर्ण करावीत असे निर्देश दिले.

०००

राजू धोत्रे/विसंअ