मुंबई, दि. १६ : संयुक्त अरब अमिरात (युएई) हा गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (जीसीसी) मधील एक महत्त्वाचा कृषीमाल-आयात करणारा देश असून, भारत तिचा एक प्रमुख अन्न व कृषी व्यापार भागीदार देश आहे. महाराष्ट्राच्या कृषी उत्पादनांची विविधता, गुणवत्ता आणि उत्तम दळणवळण सुविधांमुळे यूएई सोबत कृषी व्यापार वाढवण्याची मोठी संधी असल्याचे प्रतिपादन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
दुबई चेंबर ऑफ कॉमर्स आणि संयुक्त अरब अमिरातीचे महावाणिज्यदूत अब्दुल्ला अलमर्जुकी यांच्या सोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. रावल म्हणाले, भारत आणि यूएईमधील मजबूत द्विपक्षीय संबंध, तेथील मोठी भारतीय लोकसंख्या आणि दर्जेदार अन्नपदार्थांची वाढती मागणी पाहता, भारतीय कृषी उत्पादक व निर्यातदारांसाठी ही एक मोठी संधी आहे. विशेषतः महाराष्ट्रातील फळे, भाजीपाला, धान्ये आणि प्रक्रिया केलेले अन्न या गोष्टींना यूएईमध्ये विशेष मागणी आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्र व यूएईमधील कृषी विषयक व्यापारी संबंध अधिक सक्षम होतील, असा विश्वासही मंत्री श्री. रावल यांनी यावेळी व्यक्त केला.
00000
बी.सी.झंवर/विसंअ