पाणी व्यवस्थापनाद्वारे दीर्घकालीन शाश्वत उपाययोजनांची अंमलबजावणी करावी- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ अंतर्गत कार्यक्रमात प्रतिपादन

जलसाक्षरता, पाणीबचत, पुनर्वापरासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यातून दिशा

 सांगली, दि. २१ (जि. मा. का.) : जलसंपदा विभागाच्या वतीने सुरू असलेल्या जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या माध्यमातून भविष्यकालीन गरज ओळखून पाणी व्यवस्थापनाची दिशा देण्यात आली आहे. याद्वारे जलसाक्षरता, पाणीबचतीचे महत्त्व व वापरलेल्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर यासाठी प्रयत्न व्हावेत. पाणी व्यवस्थापनाद्वारे दीर्घकालीन शाश्वत उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ अंतर्गत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या बैठकीस खासदार विशाल पाटील, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार रोहित पाटील, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, कृष्णा खोरे महामंडळाचे माजी अध्यक्ष व माजी खासदार संजय पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे आदि मान्यवर उपस्थित होते.

जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे, मुख्य अभियंता (जलसंधारण), जलसंपदा विभाग, पुणे व अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यात प्रत्येक दिवशी करावयाचे काम ठरवून दिले आहे. शासनाच्या या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करत असल्याबद्दल पाटबंधारे विभागाचे अभिनंदन करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, उपलब्ध पाणी बाष्पीभवन व पाणीचोरीने कमी होऊ नये, यासाठी प्रयत्न करायला हवेत. या अनुषंगाने शासनाने उपसा सिंचन योजनांचे पाणी बंदिस्त जलवितरिकांमधून वितरित करण्याचा निर्णय घेतला. याचबरोबर उपलब्ध पाणी वाहून जावू नये, यासाठी अधिकाधिक पाणी साठे, तलाव, विहिरी, कूपनलिकांचे पुनर्भरण आदि पर्यायांचा वापर करावा, असे ते म्हणाले.

पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जलव्यवस्थापन  कृती  पंधरवडा  राबवत  असल्याबद्दल  जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा (विदर्भ, तापी, कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचे अभिनंदन करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आगामी काळात वापरलेल्या पाण्यावर पुनर्पक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे आज गरज बनली आहे. या पार्श्वभूमिवर सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, औद्योगिक क्षेत्रातील पाणी, बागा, गाडी धुणे आदिंच्या पाण्यावर पुनर्प्रक्रिया करता येईल. यासाठी शेतकरी, औद्योगिक कंपन्यांना आवाहन करावे. पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन विविध मार्गाने पाण्याची बचत कशी करता येईल, या अनुषंगाने पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

खासदार विशाल पाटील म्हणाले, देशातील जलविषयक प्रकल्पात आपण अग्रस्थानी आहोत. बंदिस्त जलवितरिकांची अंमलबजावणी कर्नाटक व महाराष्ट्राने सर्वप्रथम केली. विस्तारीत टेंभू व म्हैसाळ प्रकल्पास जल आयोगाची मान्यता घेतल्यास केंद्राचा निधी मिळेल. त्या दृष्टीने कार्यवाही व्हावी, असे ते म्हणाले.

कृष्णा खोरे महामंडळाचे माजी अध्यक्ष संजय पाटील म्हणाले, उपसा सिंचन योजनांनी जिल्ह्यात क्रांती केली आहे. मोठ्या प्रमाणात सिंचन झाल्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक क्षेत्र बागायती करण्यात यश मिळाले आहे. या अनुषंगाने विस्तारीत टेंभू व म्हैसाळ प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अधिकाधिक निधी देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच, उपसा सिंचन योजनांमुळे झालेला बदल व त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पालकमंत्री महोदयांनी स्वतंत्र वेळ द्यावा, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

जलव्यवस्थापन कृती पंधरवडा हा पाटबंधारे विभागाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या पंधरवड्यात नेमून दिलेली कामे विहित वेळेत पूर्ण करावीत, असे सांगून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, वीस वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्याचा मोठा भाग दुष्काळी म्हणून गणला जात असे. मात्र, सिंचन योजनांच्या अंमलबजावणीमुळे जिल्हा सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभाग कार्यवाही करत आहे. त्यामुळे गेल्या 20 वर्षात जिल्ह्यातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न जवळपास तिपटीने वाढले आहे. यामध्ये पाटबंधारे विभागाची भूमिका मोठी असून, त्यांचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, जलव्यवस्थापन महत्त्वाचे असून, पाणी वापर संस्थांचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. औद्योगिक पाण्यावर पुर्नप्रक्रिया व पुनर्वापर ही संकल्पना राबवावी. कृष्णा नदी ही आपली तारणहार असून, तिची स्वच्छता नियमित ठेवून, तिचे आरोग्य जपावे, अशा भावना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

प्रास्ताविकात अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा, जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचा हेतू विषद करून सांगली जिल्ह्यात उपसा सिंचन योजनांची सद्यस्थिती व फलश्रृती यांची माहिती दिली. कार्यकारी अभियंता सचिन पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूसंपादन संगणक प्रणालीचा तसेच कृष्णा कालवा स्वच्छता कामाचा रिमोटची कळ दाबून शुभारंभ करण्यात आला.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मोक्षगुंडम् विश्वेश्वरय्या यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 जलव्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ अंतर्गत कार्यक्रम

 दिनांक 15 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025 राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत दि. 15 एप्रिल रोजी जलसंपदा पंधरवडा शुभारंभ, 16 एप्रिल रोजी जलसंपदा अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण व  ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणे, 17 एप्रिल रोजी स्वछ व सुंदर माझे कार्यालय, जल पुनर्भरण (Rain water Harvesting), 18 एप्रिल रोजी  शेतकरी/पाणी वापर संस्था संवाद, 19 एप्रिल रोजी भूसंपादन व पुनर्वसन इ. अडचणी निराकरण, कालवा संयुक्त पाहणी, 20 एप्रिल रोजी कालवा स्वच्छता अभियान हे कार्यक्रम पार पडले आहेत.

21 एप्रिल रोजी उपसा सिंचनाचे पाणी परवानगी देण्यासाठी तक्रारींची निरसन करणे, 22 एप्रिल रोजी अनधिकृतपणे वाणिज्य व औद्योगिक पाणी उपसा प्रकरणे शोध घेऊन कार्यवाही करणे, 23 एप्रिल रोजी जलसंपदा व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पीक पद्धतीबदल, उत्पादकता वाढ, पाण्याचे नियोजन इ. बाबत बैठक/कार्यशाळा मार्गदर्शन कार्यक्रम, 24 एप्रिल रोजी सिंचन ई-प्रणाली, पाणी दर, पाणीपट्टी आकारणी व वसुली, थकीत पाणीपट्टी प्रकरणांचा आढावा, 25 एप्रिल रोजी विद्यापीठ/केव्हिके/ सेवाभावी संस्था यांच्या समवेत संवाद व कृती कार्यक्रम, 26 एप्रिल रोजी महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या प्रत्यक्ष पाणी वापराचा जललेखा परीक्षण व पाण्याचा पुनर्वापर न करता धरणांमध्ये व नदीमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असल्याबद्दल प्रकरणांचा शोध घेणे, 27 एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापन करण्यात मार्गदर्शन (पूर/मालमत्तेचे रक्षण), 28 एप्रिल रोजी महसूल विभागाच्या समन्वयाद्वारे महामंडळाचे नावे संपादित जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर नोंदी घेणे/अतिक्रमण निष्कासन दिनांक 31 मे पूर्वी करणे, 29 एप्रिल रोजी  पाणी वापर संस्था सक्षमीकरण चर्चासत्र/कार्यशाळा आणि 30 एप्रिल रोजी जिल्हा मुख्यालयी कार्यशाळा/महिला मेळावा आणि या पंधरवडा कालावधीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या अभियंत्यांचा सत्कार व पंधरवडा समारोप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

00000