पहलगाम येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली मधील तीन पर्यटकांचा मृत्यू; मृतांच्या नातेवाईकांना मदतीसाठी जिल्हा प्रशासन तत्पर

ठाणे, दि.२२(जिमाका): जम्मू- काश्मिरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे.
पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत तत्परतेने करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः कार्यरत आहे.

या संपूर्ण परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे जातीने लक्ष ठेवून आहेत. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना आवश्यक ती सर्व मदत करण्याबाबत संबंधित यंत्रणांना सूचित केले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ने नागरिकांना आवाहन केले आहे की, पहलगाम येथे आपल्या जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास त्याची माहिती तात्काळ 9372338827 / 7304673105 या क्रमांकांवर जिल्हा प्रशासनास कळवावी.

त्याचप्रमाणे श्रीनगरमध्ये पर्यटकांसाठी २४x७ मदत कक्ष सुरू करण्यात आला असून जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास कार्यरत असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि मदत डेस्क स्थापित करण्यात आला आहे.
या कक्षाच्या माध्यमातून पर्यटकांना कोणत्याही वेळी मदत मिळू शकेल. त्यांना काही अडचण आल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत ते खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात:

दूरध्वनी क्रमांक:
०१९४-२४८३६५१
०१९४-२४५७५४३
व्हॉट्सॲप क्रमांक:
७७८०८०५१४४
७७८०९३८३९७

अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.