मुंबई, दि. 23 : जिबूती व महाराष्ट्र यांच्यात केवळ व्यापाराचे नव्हे, तर परस्पर विश्वासाचे संबंध आहेत. हा विश्वास दृढ करूया आणि एकत्रितपणे वाढ आणि समृद्ध भविष्यासाठी काम करूया, असे आवाहन करुन महाराष्ट्र – जिबूती यांच्यात व्यापारासाठी नवीन दालन खुले होईल, असा विश्वास राजशिष्टाचार आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.
जिबूतीचे मानद वाणिज्यदूत विशाल मेहता आणि इंडो-जिबूती चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रतिनिधींनी मंत्री रावल यांची भेट घेतली. यावेळी इंडो-जिबूती ट्रेड अॅण्ड इंडस्ट्रीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले, जिबुती मध्ये अनेक संधी आहेत. पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे कार्य वेगाने चालू आहे. शेती क्षेत्रात कृषी पदवीधर युवकांना रोजगाराच्या तसेच कृषी, विज्ञान, बांधकाम, यासह विविध क्षेत्रात काम करण्याची संधी या देशात आहे. मुंबईत सध्या 100 हून अधिक परदेशी दूतावास व आंतरराष्ट्रीय चेंबर कार्यरत आहेत. भारताची भक्कम आर्थिक प्रगती पाहून अनेक देश मुंबईत आपली कार्यालये सुरू करत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने नव्या व्यापार संधींवर चर्चा करण्यासाठी संवादाचा प्रारंभ केला आहे.
महाराष्ट्राच्या आर्थिक योगदानाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, भारताच्या एकूण जीडीपीमध्ये सुमारे 15 टक्के महाराष्ट्राचे योगदान आहे. मागील दशकात भारतात येणाऱ्या एकूण थेट विदेशी गुंतवणुकीपैकी 30 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्र ‘एक्स्पोर्ट प्रिपेअर्डनेस’मध्ये देशात अव्वल आहे. राज्यात तीन हजारहून अधिक मोठ्या औद्योगिक युनिट्स, 50 हजार पेक्षा जास्त एमएसएमई आणि 20 हून अधिक औद्योगिक कॉरिडॉर आहेत.
महाराष्ट्र-जिबूती स्ट्रॅटेजिक बिझनेस कौन्सिलची स्थापना व दर सहामाही बैठक व्हावी, इंडो-जिबूती चेंबरमध्ये महाराष्ट्र ट्रेड फॅसिलिटेशन डेस्क तयार करावा, गुंतवणूक व व्यापार वृद्धीसाठी संयुक्त कार्यगटाची स्थापना करावी, क्षेत्रनिहाय बैठका, निर्यातीला प्रोत्साहन मिळावे, असेही मंत्री श्री. रावल यांनी यावेळी नमूद केले.
00000
बी.सी.झंवर/विसंअ/