अन्न व औषध प्रशासनात दक्षता आणि गुप्त वार्ता विभाग स्वतंत्र करावेत – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ

मुंबई, दि. २४: भेसळयुक्त अन्न शोधून त्यावर कारवाई करीत सामान्य नागरिकांचे आयुष्य निरोगी ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सातत्याने काम करतो. त्यामुळे विभागाचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्न व औषध प्रशासन अधिक बळकट करण्यासाठी दक्षता आणि गुप्त वार्ता विभाग स्वतंत्र करावे, त्यासाठी मनुष्यबळ नियुक्त करण्यात यावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिले.

मंत्रालयात अन्न औषध प्रशासन विभागाच्या विविध विषयांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंत्री श्री.झिरवळ बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकर, उपसचिव अनिल अहिरे, सहआयुक्त (विधी) दा. रा गहाणे, सह आयुक्त ( अन्न ) उल्हास इंगवले, कक्ष अधिकारी साईनाथ गालनवाड आदी उपस्थित होते.

गुप्त वार्ता आणि दक्षता विभागात पदानुसार कामकाज वाटप करावे. स्वतंत्र विभाग केल्यामुळे कामकाज गतिमान होऊन आलेल्या तक्रारींवर विनाविलंब कारवाई करणे सोपे होईल. तसेच ॲनॉलॉग पनीर बाबत केंद्र शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे कारवाई करावी. या पनीर संदर्भात विशिष्ट वजन आणि आकार असावा, अशा सूचनाही मंत्री श्री.झिरवळ यांनी दिल्या.

००००

निलेश तायडे/विसंअ