कोल्हापूर, दि. 24 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील वरिष्ठ अधिकारी श्री.प्रवीण टाके यांनी आज कोल्हापूर विभागीय माहिती उपसंचालक या पदाचा कार्यभार स्वीकारला. विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथे त्यांनी पदभार स्वीकारुन कामकाजाबाबत आढावा घेतला.
याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, माहिती अधिकारी वृषाली पाटील, उपसंपादक रणजित पवार, सहाय्यक अधीक्षक रवींद्र चव्हाण, विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
सामान्य प्रशासन विभागाच्या २२ एप्रिल रोजी काढलेल्या आदेशानुसार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील सात वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपसंचालक (माहिती) पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. या यादीत जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड म्हणून कार्यरत असलेले प्रवीण टाके यांचाही समावेश आहे.
यापूर्वी त्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात रूजू झाल्या नंतर नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रात जनसंपर्क अधिकारी, मंत्रालयात वरिष्ठ सहायक संचालक असताना लोकराज्यचे कार्यकारी संपादक म्हणून तर चंद्रपूर व नागपूर या दोन ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी या पदावर कार्य केले आहे . शासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी नागपूर पत्रिका, तरुण भारत, सामना व लोकमत या दैनिकांमध्ये पत्रकारिता केली आहे.
000000