सर्वांच्या सहकार्यातून इरई नदीचा चेहरा मोहरा बदलणार – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

इरई नदी खोलीकरण अभियानाचा शुभारंभ

चंद्रपूर, दि. 25 एप्रिल : चंद्रपूर शहराच्या प्रवेशद्वारावरच इरई नदीचे दर्शन होते. शहराला 9 कि.मी. समांतर वाहणारी ही नदी एकप्रकारे चंद्रपूर शहराचे नाक आहे. त्यामुळे ती सुंदरच असायला पाहिजे. इरईचे खोलीकरण आणि सौंदर्यीकरण करणे हे केवळ एका व्यक्तिचे काम नव्हे तर यात शासन आणि प्रशासनासह सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना, नागरिकांचेसुध्दा योगदान असणे आवश्यक आहे. त्यामुळेच लोकसहभागातून आणि सर्वांच्या सहकार्यानेच इरई नदीचा चेहरा मोहरा बदलण्याचा आपला मानस आहे, असे विचार राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केले.

जिल्हा प्रशासनद्वारे इरई नदी खोलीकरण अभियानाचा शुभारंभ करताना ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार आदी उपस्थित होते.

इरई नदी खोलीकरणाच्या कामाचे जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन केले आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, लोकसहभागातून हे खोलीकरण अभियान नक्कीच यशस्वी होईल. ही आपली नदी आहे, हे आपले अभियान आहे, अशी भावना प्रत्येक नागरिकांनी ठेवावी. तसेच या अभियानाबद्दल जास्तीतजास्त जनजागृती करावी, जेणेकरून लोकांचा यात मोठ्या प्रमाणात सहभाग. या नदीचे खोलीकरण आणि स्वच्छता ही दोन्ही कामे हाती घेण्यात येईल. आजपासून 45 दिवस हे अभियान निरंतर चालणार आहे. प्रत्येक दिवसाचे जिल्हा प्रशासनाद्वारे नियोजन करण्यात आले आहे.

इरई नदीच्या अभियानात सहभाग घ्यावा

केवळ नावासाठी विरोध करून इरई नदी स्वच्छ होणार नाही. त्यामुळे विरोधकांनी सुद्धा या अभियानात सामील व्हावे. नदीच्या खोलीकरण अभियानाबद्दल कोणीही शंका – कुशंका मनात आणू नये. आपल्या जिल्ह्याची बदनामी होणार नाही, याचीसुद्धा दक्षता घ्यावी. इरई नदीच्या खोलीकरणातून चंद्रपूरचा सन्मान वाढेल, अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केली. यावेळी पालकमंत्री डॉ. उईके यांनी, मंत्री म्हणून त्यांना मिळणारे वेतन आणि भत्ता असे एकूण 5 लक्ष रुपयांचा धनादेश इरई नदीच्या खोलीकरण अभियानासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.

इरई नदीच्या 17 कि.मीसाठी दीर्घकालीन उपाययोजना करा – आमदार सुधीर मुनगंटीवार

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्वात लोकसहभागातून इरई नदी खोलीकरणाचा शुभारंभ होत आहे, हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. नदी खोलीकरणासाठी वेगवेगळ्या स्त्रोतांतून निधी गोळा होईल. मात्र अधिकारी आणि कर्मचारीसुध्दा आपले वेतन देतात, ही अभिमानाची बाब आहे. नद्यांबाबत नागरिकांमध्ये गंभीरता असावी. मंत्री असताना जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्या सहकार्यातून आपण राज्यात 108 नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे काम हाती घेतले होते. इरई नदीमध्ये ओव्हर बर्डन जास्त जमा होत असल्यने डब्ल्यूसीएल आणि सीटीपीएस यांचे योगदान महत्त्वाचे आहे. इरई नदीच्या 17 कि.मी.साठी दीर्घकालीन उपाययोजना करणे आवश्यक आहे. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवण्यासाठी उत्तम नियोजन व्हावे, तसेच हे अभियान निरंतर चालावे. पर्यावरण तज्ज्ञांचीसुद्धा एक स्थायी स्वरूपाची समिती यासाठी गठित करावी, असे आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले. यावेळी त्यांनी आपला एक महिन्याचा पगार या अभियानासाठी देत असल्याचे जाहीर केले. 

नद्यांच्या काठावर मानवी वस्ती वसली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात इरई, झरपट, वैनगंगा, वर्धा या नद्या वाहतात. पहिल्या टप्प्यात इरई नदीचे खोलीकरण व त्यानंतर सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. हे संपूर्ण अभियान प्रशासनाने पूर्ण क्षमतेने राबवावे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. पुढे ते म्हणाले, जिल्हा प्रशासनाने कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले आहे. 17 किलोमीटरची जीवनवाहिनी असलेल्या या नदीवर आणखी तीन ते चार बंधारे बांधण्याचे नियोजन करावे. तसेच धानोरा बॅरेज प्रकल्प आगामी काळात पूर्ण करण्यात यावा. इरई नदी पूर संरक्षण भिंतीचा प्रस्ताव शासन स्तरावर मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी 2 लक्ष 55 हजार रुपयांचा धनादेश अभियानासाठी पालकमंत्र्यांकडे सुपुर्द केला.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, आज अतिशय महत्त्वकांक्षी कामाचा शुभारंभ होत आहे. चंद्रपूर शहरात पावसाळ्यात दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते. इरई नदी ही चंद्रपूरची लोकवाहिनी आहे. त्यामुळे तिला वाचवणे आपले कर्तव्यच आहे. 17 कि.मी.च्या तीन टप्प्यात एकूण 5 लक्ष ब्रास गाळ, वाळू मिश्रित गाळ नदीतून काढण्याचे नियोजन आहे. शेतकऱ्यांना हा गाळ मोफत देण्यात येईल. त्यामुळे त्यांची शेती सुपीक होण्यास मदत होईल. घरकुल लाभार्थ्यांना या नदीतील वाळू मोफत देण्यात येणार आहे तर शासकीय व इतर कंत्राटदारांना अल्प दरात वाळू मिळेल, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात मनपा आयुक्त विपीन पालीवाल म्हणाले, नदी असलेली शहरे ही भाग्यवान असतात. विकासाच्या भारामुळे इरई नदी घुसमटत आहे. त्यामुळे खोलीकरणाचा आज शुभारंभ करण्यात आला. यासाठी पालकमंत्र्यांनी दोन महिन्यांपूर्वीच आराखडा तयार केला आणि लोकसहभागाने हे अभियान राबविण्याच्या सूचना केल्या. या अभियानात शासन – प्रशासन, यांच्यासोबतच लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना व सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. चंद्रपूर महानगरपालिकेला नुकतेच 8 लक्ष रुपयांचे दोन पुरस्कार मिळाले असून दोन्ही पुरस्काराची रक्कम या अभियानासाठी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पुर्वी मान्यवरांच्या हस्ते खोलीकरणाच्या यंत्रसामुग्रीचे उद्घाटन आणि नदीच्या पात्रात कुदळ मारून खोलीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रिध्दी उईके यांनी तर आभार अधिक्षक अभियंता प्रवीण झोड यांनी मानले.